अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याचा मुलीच्या भावाने काढला काटा

नागपूर : २५ ऑक्टोबर – सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काल ७ वाजताच्या सुमारास ब्लॅकमेल करीत अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने अनैतिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर मुलीच्या आईला या संबंधांबाबत सोशल मीडियावर वाच्यता करण्याची धमकी दिली. त्यामुळे चिडलेल्या मुलीच्या भावाने मित्राच्या मदतीने त्या तरुणाच्या पोटावर चाकूने वार करीत त्याची हत्या केली व मृतदेह चादरीत गुंडाळून झुडपात फेकला. ही घटना रात्री १0 नंतर उघडकीस आली. अय्याज ऊर्फ छुट्टन इस्राइल सिद्दीकी (वय ३0) असे मृताचे तर इरफान खान (वय २४) व मेहबूब ऊर्फ टिनू सिद्दीकी (वय २0) असे अटकेतील आरोपीचे नावे असून, तिघेही वलनी, ता. सावनेर येथील रहिवासी आहेत.
या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली. अय्याजचे कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील असून, ते नोकरीनिमित्त वलनीत आले आहेत. अय्याज व इरफान शेजारी असल्याने त्यांची आपसात ओळख होती. शिवाय, एकमेकांकडे ये-जा होती. अय्याजने आरोपींपैकी एकाच्या अल्पवयीन बहिणीसोबत बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे तसेच त्याच्या आईला मारहाण केल्याची माहिती मिळाली होती. अय्याज व त्याची बहीण रविवारी सायंकाळी एकाचवेळी घराबाहेर जात असल्याचेही त्याच्या लक्षात आले होते. त्याने हा प्रकार मित्राला सांगितला आणि अय्याजच्या खुनाची योजना आखली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी अय्याजला रात्री ७ वाजताच्या सुमारास राकेश झा यांच्या वलनी येथील शिवारात बोलावले. तो शेतात येताच अंधाराचा फायदा घेत इरफानने त्याला पकडले आणि मेहबूबने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच मृतदेह चादरीत गुंडाळला व शेताजवळील नाल्याकाठच्या झुडपात फेकला. शिवाय, पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतकाचा मोबाईल फोनही फोडला. फिर्यादी मोहम्मद इसराईल वल्द अब्दुल रज्जाक सिद्दीकी (वय ५६), रा. क्वार्टर नं. ५५८, वॉर्ड नं. ४, वलनी, वेकोलि कॉलनी यांच्या तक्रारीवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपींविरुद्ध कलम ३0२, २0१, ३४ भादंवि. अन्वये गुन्हा नोंद केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्य़ाचा पुढील तपास पो. उप.नि. सूर्यप्रकाश मिश्रा करीत आहे.

Leave a Reply