रेल्वेत चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : २५ ऑक्टोबर – रेल्वे मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या व मेल-एक्सप्रेसमधील रेल्वे प्रवाशांचे लेडीजपर्स, सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखा लोहमार्ग नागपूर पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीला आसाम येथून अटक करण्यात आले. रेल्वे पोलिसांची कारवाई दरम्यान त्यांच्याकडून १0 लाख ६0 हजार ३८३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या चोरांविरुद्ध गोंदिया रेल्वे पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते.
नागपूर लोहमार्ग पोलीस जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील गोंदिया लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत हावडाकडून येणार्या मेल-एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यात रेल्वे प्रवाशांच्या लेडीज पर्स, सोन्याचे दागिने व रोख रुपयांच्या चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. रेल्वे प्रवासी गाड्यांचे रिझर्वेशन चार्ट, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांचे विेषण करण्यात आले. तेव्हा आरोपी हे आसाम प्रांतातील नोगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. नयनमुखी चंद्रकांता मेधी (वय २६), दीपज्योती चंद्रकांता मेधी (वय २२) व संजू रामनारायण राय (वय २८) सर्व रा. डबोका, नोगाव आसाम अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना आसाम राज्यात जावून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांनी रेल्वे प्रवासी गाडीच्या एसी कोचमध्ये रिझर्वेशन करून रेल्वे प्रवाशांचे लेडीज पर्स चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. यात ६ लाख ८६ हजार ४00 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वितळवून तयार केलेली १४३ ग्राम वजनाची सोन्याची लगड, १ लाख ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वितळवून तयार केलेली ४१.१९0 ग्राम वजनाची सोन्याची लगड व १ लाख २0 हजार ३८३ रुपये किंमतीच्या ३0 ग्राम वजनाच्या आठ नग सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या. तसेच रेल्वे पोलीस ठाणे गोंदिया येथील अपराध क्रमांक ५१/२0२१ कलम ३७९, ३४ भादंवि गुन्ह्यातील रेल्वे पोलिसांची कारवाई अशी आहे. आरोपींनी १ लाख ५ हजार ६00 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने वितळवले होते. तसेच त्यापासून २२ ग्राम सोन्याची लगड तयार केली होती. ही लगड जप्त करण्यात आली. अशाप्रकारे दोन गुन्ह्यातील एकूण १0 लाख ६0 हजार ३८३ रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास कानपिल्लेवार यांच्या सूचनेवरून, गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार दीपक डोर्लीकर, रवींद्र सावजी, महेंद्र मानकर, पोलीस नायक रविकान्त इंगळे, अविन गजवे, पोलीस शिपाई गिरीश राऊत, रोशन अली, चन्द्रशेखर मदनकर, सायबर शाखेचे पोलीस शिपाई संदीप लहासे व रेल्वे पोलीस मुख्यालय अजनी क्वार्टरचे पोलीस शिपाई केवट, उमक, राठोर यांनी केली.

Leave a Reply