नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुनील केदार यांच्या गटाचा एकहाती विजय

नागपूर : २५ ऑक्टोबर – विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली असून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सहकार गटाने एक’हाती’ विजय मिळवला आहे. संपूर्ण जागेवर विजय मिळवत विरोधकांचा धुरळा उडवला. मागील चार वर्षांपासून प्रशासक असल्याने यावेळी निवडणूक लढवण्यात आली.
या निवडणुकीत सहकार पॅनलचे सेवा सहकारी संस्था मतदार संघातून विजय चौधरी, वसंतराव लांडगे, प्रकाश नागपुरे, अजय राऊत, बेनिराम राऊत, अहमदभाई शेख, बाबाराव शिंदे, रवीचंद्राबाई नांदूरकर, अंजली शिंदे, हरिभाऊ गाडबैल, अशोक सोनवाने, ग्रामपंचायत मतदारसंघातील संजय कुंटे, दीपक राऊत, महेश चोखंद्रे, नारायण कापसे, व्यापारी मतदारसंघातील प्रकाश वाधवाणी, अतुल सेनाड व हमाल मतदारसंघातून किशोर पलांदूरकर यांनी विजय मिळविला आहे.
सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या पुढाकाराने १९७४ साली बाजार समितीची स्थापना केली होती. केंद्र शासनाने केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याबाबत विचार करावा. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याची टीका मंत्री सुनील केदार यांनी प्रसिध्दी पत्रकातून केली. येत्या काळातही जनता भाजपाला त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही, असे केदार म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयानंतर शेतकरी, कष्टकरी वर्गाला योग्य न्याय देण्यात येणार असल्याचे मंत्री केदार यांनी सांगितले.

Leave a Reply