नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी दरोडा, ५० तोळे सोने असलेली तिजोरीच पळवली

नागपूर : २५ ऑक्टोबर – शहरातील गुन्हेगारांची किती हिंमत वाढली आहे आणि त्यांच्यावर पोलिसांचा किती वचक उरलाय, याचा आरसा दाखविणारी बातमी आहे. शहरातील भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरट्यांनी चक्क तिजोरीच चोरून नेली. या तिजोरीत ४0 ते ५0 तोळे सोने, महागडे घड्याळ तसेच अन्य मौल्यवान वस्तू असल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच चोरट्यांनी नगरसेवकाच्या घरून मोठा हात मारला आहे. तिजोरी घेऊन पसार झालेल्या चोरट्यांचा तपास करण्यासाठी पोलिस कामाला लागली आहे.
सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली. नगरसेवक संदीप गवई हे हजारीपहाड परिसरात वास्तव्याला आहेत. हा परिसर गिट्टीखदान पोलिस ठाणे हद्दीत येतो. तर ते दक्षिण नागपूर येथील रमानगर, शताब्दी चौक परिसरासह या प्रभागाचे नेतृत्व करतात. ते १७ ऑक्टोबर रोजी कुटुंबीयांसह मुंबईला गेले होते. यावेळी त्यांच्या घरात नातेवाईक होते. दरम्यान, गवई हे ते २२ ऑक्टोबरला नागपूर शहरात आले. दरम्यान, २४ ऑक्टोबर रोजी त्यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती त्यांनी दिली. चोरट्यांकडून करण्यात आलेल्या या धाडसी चोरीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. संदीप गवई यांच्या शयनकक्षाच्या बाजूला तिजोरी ठेवली होती. चोरट्यांनी चोरी करताना चक्क ही तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीत मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागिने, गोल्ड प्लेटेड घड्याळ याव्यतिरिक्त मौल्यवान वस्तूंसह ४0 ते ५0 लाख रुपयांचा ऐवज असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गवई यांच्या घरी पोहोचून श्वान तसेच ठसे तज्ज्ञांचे पथक बोलावले. पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. झालेल्या या चोरीच्या घटनेत चोरट्यांनी घरातील अन्य वस्तूंना हात न लावता केवळ तिजोरीच उचलून नेली. यामुळे तिजोरीत काय आहे, शिवाय गवई हे घराबाहेर कधी जाणार आहेत, याची माहिती असणार्या किंबहुना संपर्कातील व्यक्ती असल्याचा प्राथमिक अंदाज बांधल्या जात आहे. याव्यतिरिक्त चोरी ही दोन दिवसांपूर्वी झाली. दोन दिवसांनी त्यांनी याची माहिती पोलिसांना कळविली. या दोन दिवसात त्यांच्या घरात चोरी झाल्याचे कळले कसे नाही, यावरूनही पोलिस तपास करीत आहे.

Leave a Reply