अन्याय, अत्याचाराविरोधात बेळगावात मराठी भाषिकांचा विशाल मोर्चा

बेळगाव : २५ ऑक्टोबर – कर्नाटक शासनाकडून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केल्याने खडाजंगी उडाली.
कर्नाटक शासन मराठी भाषिकांना सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा भाषिकांचा आरोप आहे. बेळगाव महापालिकेसमोर लावलेला अनधिकृत लाल-पिवळा झेंडा हटवण्यात यावा, मराठी भाषेतून शासन आदेश प्रसिद्ध व्हावेत, फलक लावले जावेत, आदी मागण्यांसाठी धर्मवीर संभाजी चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत चोहोबाजूंनी बॅरिकेटे्स लावले होते. आंदोलकांनी मोर्चाचा निर्धार कायम ठेवत ‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मराठी भाषिकांना हक्क मिळालेच पाहिजे,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
काही आंदोलकांनी पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. तर काहीजण पर्यायी मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ लागले. याप्रसंगी आंदोलक -पोलिसात शाब्दिक चकमक उडाली. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आंदोलक यशस्वी ठरले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे शुभम शेळके, मदन बामणे, रेणू किल्लेदार यांच्यासह युवक, महिलांचा मोर्चात मोठा समावेश होता.

Leave a Reply