शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल – छगन भुजबळ

नाशिक : २४ ऑक्टोबर – अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आर्यनच्य अटकेप्रकरणी एनसीबी आणि अधिकाऱ्यांवर आरोप केले. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी याचं प्रकरणावरून भाजपाला टोला लगावला आहे. अभिनेता शाहरुख खानने भाजपामध्ये प्रवेश केल्यास ड्रग्जचे रुपांतर साखरेत होईल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ पक्षातर्फे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले, की गुजरातमधील मुंद्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे. मात्र या प्रकरणाचा तपास करण्याऐवजी एनसीबी शाहरुख खानच्या मागे लागली आहे. शाहरुख खानने भाजपामध्ये केल्यास ड्रग्जचे साखरेत रूपांतर होईल. दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील पार्टीदरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले होते. आर्यन खान आणि त्याच्या मित्रांना अंमली पदार्थ बाळगणे, सेवन, खरेदी आणि तस्करी या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आर्यनसह त्याचे मित्र तुरुंगात असून त्यांना जामीन देण्यात आलेला नाही.
मुंबई क्रूझ पार्टी प्रकरणात आता आणखी काही नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणात अटकेत असलेला, अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या बँक खात्यांचा तपशील आता एनसीबीकडून तपासला जात आहे. त्यासोबतच डिलीट करण्यात आलेले व्हॉटसप मेसेजही शोधून काढण्यात येणार आहेत. या प्रकरणात आर्यन खान आणि इतर आरोपींनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज खरेदी केली आहे का? याची खात्री करण्यासाठी बँक खाती तसंच व्हॉटसप मेसेज तपासले जाणार आहेत. २६ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता एनसीबी आर्यन खान विरोधात आणखी पुरावे गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

Leave a Reply