पॅरोलवर असलेल्या कैद्याचा पोटच्या मुलानेच केला खून

बुलडाणा : २४ ऑक्टोबर – गेल्या काही वर्षांपूर्वी खूनाच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी पॅरोलवर सुट्टी घेवून घरी आल्यानंतर पोटच्या मुलाने मित्राच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरमध्ये घडली आहे. दारू पिऊन आईला आणि बहिणीला मारहाण करत होता म्हणून मुलाने हे कृत्य केल्याचे कबूल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल इथं ही घटना घडली आहे. संगीत राजाराम इंगळे (वय ४९) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी संगीत इंगळेचा मृतदेह हा संग्रामपूर -वरवट (बकाल) गावाजवळील रस्त्यावर पोलिसांना आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले.
घटनास्थळाचा पंचनामा करत इंगळेचा मृतदेह वरवट बकाल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण केले असता श्वान मृतक इंगळेच्या घरी पोहचले तेथून काही पुरावे हस्तगत केल्यानंतर मृतकाचा मुलगा विपुल संगीत इंगळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी विपुल इंगळेची कसून चौकशी केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तर दिली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच मित्राच्या मदतीने वडिलांचा खून केल्याचं कबूल केलं. त्याच्या कबुलीजबाबवरून पोलिसांनी त्याच्या मित्रालाही अटक केली.
सदर घटनेची फिर्याद पोलीस पाटील शुद्दोधन श्रीराम इंगळे यांनी दिली. त्यावरुन खुनाच्या गुन्ह्याच्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला संगीत इंगळे हा कोरोनामुळे एक वर्षासाठी पॅरोलवर २२ ऑक्टोबर रोजी घरी आला होता. पण त्याच दिवशी त्याच्या मुलाने त्याचा खून केला आणि मृतदेह रस्त्याच्याकडेला फेकून दिला.
मृतक संगीत इंगळे याने दारुच्या नशेत पत्नी, मुलगी व आरोपी मुलगा यास दारु मारहाण करुन त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून आरोपी मुलगा विपुल इंगळे याने त्याच्या मित्राच्या मदतीने धारदार शस्त्राच्या सहाय्याने जिवानिशी ठार केले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोटरसायकलवर आणून वरवट बकाला शिवारात रोडच्या बाजूला फेकून दिला होता.
तामगांव पोलिसांनी आरोपी मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply