ताडोबा भवनाचे बांधकाम जलदगतीने करण्यात यावे – सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

चंद्रपूर : २४ ऑक्टोबर – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत क्षेत्र संचालक कार्यालय, उपसंचालक कोअर व उपसंचालक बफर ही तिन्ही कार्यालये वेगवेगळया ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यालयांना पुरेशी जागा उपलब्ध नाही. क्षेत्र संचालक कार्यालयाचे बांधकाम १९१२ मध्ये म्हणजे ब्रिटीशकाळात झाले आहे. या इमारतीला सुमारे १०९ वर्षे पूर्ण झाली असल्याने वारंवार दुरूस्ती करावी लागते. यादृष्टीने ताडोबा भवन असे नाव देवून एकत्रित इमारतीचे बांधकाम करावे. यासाठी २०१९ मध्येच १८.०८ कोटीचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. यासाठी त्वरित निधी मंजूर करण्यात यावा व ताडोबा भवनाचे बांधकाम जलदगतीने करण्यात यावे, अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार झालेल्या व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. बांबु फुलोरा व्यवस्थापनासाठी अनुदान उपलब्ध करावे अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, बांबू हे हिरवे सोने असून, बांबुची उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रात २०१८ पासून बांबूला फुलोरा येण्यास सुरूवात झाली आहे. पुढील एक ते दोन वर्षात बांबुला फार मोठया प्रमाणात फुलोरा येण्याची शक्यता आहे. यास उपाय योजना म्हणून सेवक संस्थेमार्फत विस्तृत सर्व समावेशन नियोजन आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
यासाठी ६९३०२.८० लाखांचा बांबु फुलोरा व्यवस्थापन योजना आराखडा तयार करून मंजूरी व अनुदानाकरिता सादर करण्यात आलेला आहे. यासाठी २०२१-२०२२ करिता २११७.३० लाखाची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी प्रथम टप्प्यात ११२.३४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. उर्वरित अनुदान त्वरित मिळणे आवश्यक आहे. या आराखडयामध्ये प्रामुख्याने बांबु कुपांची कामे, रस्त्यालगत असलेल्या अग्नीसंरक्षण रेषेचा विस्तार करणे, पुननिर्मीतीकरिता बांबु बिया गोळा करून सीडबॉल तयार करणे, अग्नीसंरक्षण उपकरणे खरेदी करणे, गश्तीकरिता वाहन खरेदी करणे आदी बाबींचा समावेश असुन, यासाठी तातडीने आवश्यक अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
व्याघ्र सफारी व वन्यजीव केंद्र निर्माण करण्याबाबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर येथे चंद्रपूर-मुल राष्ट्रीय महामार्गालगत वन प्रबोधिनीच्या बाजूला असलेल्या चंद्रपूर प्रादेशिक वनविभागातील वनखंड क्रमांक ४०२ व ४०३ मध्ये व्याघ्र सफारी निर्माण करण्याच्या दृष्टीने जागेची निवड करण्यात आलेली आहे. सदर जागेवर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्र निर्माण करण्याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आला असून, सेंट्रल झू अँथॉरिटीकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याबाबत राज्य शासनाने प्रभावी पाठपुरावा करण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या चंद्रपूर व चिमूर येथील अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करावे, अशी मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली.

Leave a Reply