गोंदिया वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू

गोंदिया : २४ ऑक्टोबर – तिरोडा वनपरिक्षेत्रातील वडेगाव सहवनक्षेत्रातंर्गत लोणारा बिटात सितेपार शेतशिवारात २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा मृतदेह आढळला. दरम्यान आज, शवविच्छेदन करुन त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. सितेपार येथील किसनलाल बघेले यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेतील बिबट आढळला.
ही माहिती मिळताच तिरोडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे, क्षेत्र सहायक एम. एम. कडवे व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तसेच गोंदियाचे उपवनसंरक्षक व पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र अंधार पडल्याने बिबट्याचा मृतदेह शेतातच सुरक्षीत ठेवण्यात आला. दरम्यान, आज, एकोडीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विवेक गजरे, वडेगावच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. रेणुका शेंडे, गोंदियाचे पशुधन विकास अधिकारी डॉ. देवेंद्र कटरे यांच्या पथकाने बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन बिबट्याला जाळण्यात आले.
यावेळी सहायक वनसंरक्षक आर. आर. सदगीर, तिरोडाचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. के. आकरे, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे उपस्थित होते. सदर बिबट हा एक वर्षापेक्षा लहान असून त्याचा मृत्यू कावीळ आजार व जंताच्या प्रादुर्भावाने झाला असल्याचा अंदाज पशुधन विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान वैद्यकीय परिक्षणासाठी मृत बिबट्याचे अवयवाचे नमुने घेण्यात आले.

Leave a Reply