अभियंत्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर स्वीकारून बांधकाम खर्चात बचत करावी – नितीन गडकरी

नागपूर : २४ ऑक्टोबर – रस्ते असो की इमारत, अशा बांधकामात अभियंत्यांनी नवीन तंत्राचा वापर स्वीकारून बांधकाम खर्चात बचत करावी. हे करताना प्रदूषण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच बांधकाम क्षेत्रासाठी लागणार्या वाहनांमध्ये जैविक इंधनाचा वापर करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
स्थापत्य अभियंत्यांच्या 36 व्या राष्ट्रीय परिषदेला नितीन गडकरी आभासी माध्यमातून संबोधित करीत होते. याप्रसंगी ते म्हणाले, दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध होतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधकामाचा खर्च कमी करणे शक्य आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करताना आम्ही वाया गेलेले प्लॅस्टिक, रबर, टायरचे तुकडे यांचा वापर करीत आहोत. यासंदर्भात महामार्ग मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच उड्डाणपूल बांधताना स्टील फायबरचा वापर आम्ही करीत आहोत. ३० ते ४० टक्के या तंत्राचा वापर केला जात आहे.
बांधकाम करण्यापूर्वी जे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केले जातात, ते चांगल्या पद्धतीने बनविले जावे. अचूक डीपीआर तयार झाले तर बांधकाम चांगल्या दर्जाचे होते, असे सांगताना गडकरी म्हणाले, ई-निविदा पद्धतीचा अवलंब प्रकल्पांसाठी अत्यंत योग्य आहे. यामुळे पारदर्शकता आणि प्रकल्पांना गतिशीलता येते. तसेच प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे.
स्टील आणि सिमेंट उद्योग सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा फायदा घेत असताना वाया जाणारे प्लॅस्टिक, रबर व अन्य वस्तूंचा रस्ते बांधकामात उपयोग करणे म्हणजे खर्चात बचत करणे होय. तसेच दुमजली उड्डाणपुलाची पद्धत आता आली आहे. भारतीय महामार्ग विकास प्राधिकरणाने नुकतीच राजस्थानमध्ये वाहने व विमानासाठी एअरस्ट्रीप तयार केली आहे. अशा १९ एअरस्ट्रीप देशात तयार केल्या जाणार आहे. या रस्त्यावर विमान उतरविणेही शक्य होणार आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply