संपादकीय संवाद – १०० कोटी लसीकरण पूर्ण केल्याबद्दल भारतीय अभिनंदनास पात्र

कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटाशी सामना करताना आज भारताने १०० कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे, ही निश्चित अभिनंदनीय बाब आहे. त्यानिमित्त आज भारतातील प्रत्येक नागरिक आणि विशेषतः लसीकरण मोहिमेत ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली ते कोरोनायोद्धे निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
२०२०च्या सुरुवातीला ज्यावेळी कोरोनाची साथ सुरु झाली, त्यावेळी संपूर्ण देश हादरला होता. अशाप्रकारच्या जागतिक महामारीचे संकट यापूर्वी १९२०च्या दरम्यान आले होते, त्याकाळातील बहुतेक सर्व पिढ्या यावेळी स्वर्गस्थ तरी झाल्या होत्या, किंवा अगदी तुरळक हयात असलेल्या व्यक्ती वयोवृद्ध झाल्या होत्या. त्यामुळे हे महामारीचे संकट कश्यापद्धतीने हाताळायचे याचा अनुभव कुणालाही नव्हता. तरीही प्रशासन सामाजिक संघटना आणि जनसामान्य यांनी अतुलनीय धैर्याने आणि सुजाण सामंजस्य दाखवत या संकटाचा सामना केला. त्यामुळे जीवितहानी कमी करण्यात आम्ही भारतीय निश्चितच यशस्वी ठरलो. नाही म्हणायला कोरोनाच्या लढाईवरून आपल्या देशात राजकारण बरेच केले गेले, मात्र राजकारण बाजूला ठेवत जनसामान्यांनी या संकटाशी सामना केला हे विशेष महत्वाचे.
कोरोनाचे संकट आले त्यावेळी या व्याधीवर कोणतेही औषध नव्हते, तरीही डॉक्टर मंडळींनी धैर्याने सामना करीत रुग्णांना दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी जगभरात कोरोनावरील औषधाचे संशोधन सुरु होते, त्यात भारतीय संशोधक आणि औषधनिर्मिती उद्योग हे दोनही आघाडीवर होते. परिणामी आदर पूनावालांसारख्या भारतीय उद्योजकाने कोव्हीशील्ड सारखे औषध शोधून काढले, त्याचबरोबर परदेशातूनही औषधी मागवल्या गेल्या, आणि त्यातून व्यापक लसीकरण मोहीम राबवली गेली.
भारतात लसीकरण मोहीम सुरु झाली ती फेब्रुवारी २०२१ मध्ये मात्र आठ महिन्याच्या कालावधीत आम्ही १०० कोटी नागरिकांचे लसीकरण करू शकलो आहोत, ही अभिमानास्पद बाब आहे.
याचे श्रेय या देशातील प्रशासन आणि आरोग्यव्यवस्थेलाच द्यायला हवे. त्याचबरोबर प्रशासनावर विश्वास ठेऊन लाखो नागरिकांनी लसीकरण करवून घेतले, त्यांचेही श्रेय नाकारता येत नाही. आज १०० कोटी नागरिक लसीकरण झाल्यामुळे कोरोनाच्या सुरक्षा कवचात सुरक्षित झाले आहेत, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
देशातील १०० कोटी नागरिकांचे लसीकरण झालेले असले तरी अजून ३५ कोटी नागरिकांचे लसीकरण व्हायचे आहे, त्यात बहुसंख्य तरुण मंडळी आणि बालकांचा समावेश आहे. १२ वर्षांखालील बालकांसाठीही नवी लस उपलब्ध झालेली आहे, त्यांचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
जगभरात ज्या वेगाने लसीकरण झाले, त्या तुलनेत भारताने आपली गती जबरदस्त आहे, हे दाखवून दिले आहे. त्याबद्दल समस्त भारतीयांचे पंचनामाच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. लसीकरण झाले असले, तरीही कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही, त्यामुळे पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, लसीकरण झाले असले तरीही प्रत्येक नागरिकाने कोरोनाचे नियम पाळावे आणि स्वतःचे तसेच समाजाचे रक्षण करावे, असे आवाहन पंचनामा यावेळी करत आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply