जुन्या वादातून चौघांनी केली एकाची चाकूने भोसकून हत्या

नागपूर : २१ ऑक्टोबर – नागपूरचा दिवस आज हत्येच्या घटनेने उजाडला, पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गोल्डी शंभरकर नावाच्या युवकाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींची नावे समोर आली असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. आपसातील जुन्या वादामुळे ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
नागपूरच्या पाचपावली परिसरात सकाळच्या वेळी घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. मृत गोल्डी शंभरकर आणि चार आरोपी हे मित्र होते, मात्र सकाळीच यांच्यामध्ये जुन्या वादावरुन भांडणं झाली. त्यानंतर गोल्डीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
मृत आणि आरोपी हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. २०१८ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या हत्येचं नेमकं कारण काय आणि कशावरुन त्यांच्यात वाद झाला हे आरोपींच्या अटकेनंतर स्पष्ट होईल. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करत चार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसांमध्ये सतत हत्यासत्र सुरू असून यामुळे नागपुरात चांगलीच खळबळ माजली आहे. क्षुल्लक कारण असलं तरी भरदिवसा झालेल्या या हत्या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply