सर्वांनी एकत्र येऊन ईडीच्या विरोधात उठाव करावा – छगन भुजबळ

नागपूर : २० ऑक्टोबर – महाराष्ट्रात हल्ली ईडीने उच्छाद मांडला आहे. अधिकाऱ्यांच्या आधी भाजपच्या नेत्यांना कोणावर व कुठे कारवाई होणार, याची माहिती असते. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन ईडीच्या विरोधात उठाव करावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले.
गडचिरोली येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात भुजबळ उपस्थित होते. हा मेळावा आटोपल्यानंतर मंगळवारी रात्री भुजबळ नागपुरात परत आले. येथून मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर टीकेची झोड उठविली. ईडीच्या सर्व कारवाया राजकीय आहेत. फक्त महाविकास आघाडीतील मंत्री व नेत्यांवरच छापे घातले जात आहेत. आजवर ईडीच्या ज्या कारवाया केल्या त्याचा तपशील जाहीर केला नाही. त्यामुळे केवळ राजकीय आकसापोटी केंद्र सरकार ईडीचा वापर करीत असल्याचे दिसून येते. भाजपचे नेते आधी हवेत आरोप करतात. नंतर ईडीला निवेदन देतात. त्यानंतर ईडीचे पथक संबंधित नेत्यांच्या घरी, कार्यालयावर धडकते. आतातर हे नेते ईडीच्या नावाने धमक्याही देत आहेत. त्यामुळे ईडीच्याच विरोधात उठाव करण्याची वेळ आल्याचे भुजबळ म्हणाले.
महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासूनच हे सरकार पडणार असल्याचे भविष्य काही लोक वर्तवित आहे. मात्र हे सर्व मुहूर्त फोल ठरले. आघाडीने सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोपयर्ंत ठाम आहेत तोपयर्ंत राज्यातील आघाडी सरकार कोसळणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर झाला तरी त्यातून काहीही साध्य होणार नाही. हा गैरवापर करणाऱ्यांचा सर्व खटाटोप वाया जाईल, असे भुजबळ म्हणाले.

Leave a Reply