संपादकीय संवाद – राज्याच्या समतोल विकासाची जबाबदारी विरोधी पक्षनेत्यांचीही आहे

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन साखर उत्पादक लॉबीतील साखर कारखानदारांच्या समस्यांची सोडवणूक केली असल्याची बातमी आज सर्वत्र प्रकाशित झाली आहे. राज्यात साखर उत्पादक कारखाने मोठ्या प्रमाणात असून या साखर कारखानदार लॉबीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर जबरदस्त पगडा आहे, त्यामुळे साखर उत्पादकांच्या समस्यांची सोडवणूक होणे हे स्वागतार्हच मानावे लागेल.
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात या साखर कारखानदारीचे अक्षरशः पेव फुटले असून स्वातंत्र्योत्तर काळात राज्याच्या अर्थकारणावर या कारखानदारीने प्रचंड प्रभाव टाकला आहे. या कारणामुळेच राज्याच्या सत्ताकारणावरही पश्चिम महाराष्ट्राचा कायम प्रभाव राहिला आहे. परिणामी राज्य सरकारने या उद्योगाला अनेक सवलती देत साखर उद्योगाचे फाजील लाड केले आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे लाड करतांना राज्याच्या इतर मागास भागावर अन्याय करण्यात आला हे वास्तवदेखील नाकारता येत नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादन होते म्हणून तिथे साखर कारखानदारीला प्रोत्साहन दिले गेले, मात्र त्याच धर्तीवर विदर्भ आणि खान्देशात कापूस उत्पादन मुबलक असतानाही कापड गिरण्यांना कधीच प्रोत्साहन दिले गेले नाही. परिणामी विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी कायम नागवलेलाच राहिला. विदर्भात संत्रा उत्पादनावरही कारखानदारी उभी राहू शकली नाही. जळगाव जिल्ह्यात केळीचे मुबलक पीक आहे, मात्र केळावर आधारित उद्योग कधीच उभे राहिले नाहीत. एकूणच काय तर राज्यात सत्ताकेंद्र पश्चिम महाराष्ट्रात केंद्रित झाले असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाला जास्तीत जास्त सवलती कश्या मिळतील हाच प्रयत्न केला गेला.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे सुपुत्र आहेत, असे असले तरी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी फक्त विदर्भ असा विचार न करता संपूर्ण राज्याचा व्यापक विचार केला. आजही ते त्याच मार्गावर मार्गक्रमण करीत आहेत. मात्र हे करत असताना त्यांनीही पश्चिम महाराष्ट्राचे फाजील लाड करत विदर्भाकडे दुर्लक्ष करणे हे काहीसे न रुचणारे आहे. साखर कारखानदारीचे अतिरेकी लाड केल्यामुळे राज्यासमोर अनेक नवनव्या समस्या उभ्या झाल्या आहेत, हे वास्तवही नाकारता येत नाही. त्यामुळे आता साखर कारखानदारांचे लाड कमी करून इतर भागांकडे लक्ष कसे पुरवता येईल याचा विचार फडणवीसांनी करायला हवा. शेवटी राज्यात समतोल विकास साधने ही मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्षनेत्यांची देखील जबाब्दासरी आहे, याचे भान फडणवीसांनी ठेवावे इतकेच इथे सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply