मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : २० ऑक्टोबर – अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर तातडीने कारवाई करावी. यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या.
मुंबईत पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकले जाते असे निदर्शनास आले आहे. याठिकाणी कॅमेरे लावून जे हे करीत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई करा. कोविड मध्ये आपण खूप चांगली कामगिरी केली आहे. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता, नागरी सुविधांच्या बाबतीत पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून कालबद्ध रीतीने ती कामे पूर्ण करा आणि मुंबई शहराचा देशात आदर्श निर्माण करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, सहायक आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, पालिका रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते.
मुंबईत अनधिकृत बांधकामे सहन केली जाणार नाहीत. प्रभाग अधिकाऱ्यांनी अतिशय जागरूकपणे आणि कर्तव्यकठोरपणे यावर तातडीने कारवाई करावी. कुणाचाही दबाव आला तरी तो सहन करू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. मुंबईतील रस्ते दुरुस्ती कामांची निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे आणि पारदर्शक पद्धतीने करा, कुणालाही बोट उचलण्याची संधी मिळता नये. आपल्याला शहर सुंदर आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले करायचे आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ, दुभाजक, रस्त्यांच्या कडेचे कठडे, बागा-उद्याने सुंदर आणि व्यवस्थित असतील हे पाहण्याचे काम आपले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने पूर्ण झाले पाहिजे, त्यासाठी कालमर्यादा ठरवून द्या, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. कोविड लढाईत मुंबई मॉडेलची प्रशंसा झाली. आपल्या प्रयत्नांमुळे ते शक्य झाले आहे, टीमवर्क म्हणून आपण स्वतः:ला सिद्ध केले आहे, पण एवढ्यावरच न थांबता आता आपल्याला नागरी सुविधांवर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण दररोजच्या स्वच्छतेसाठी प्रभागनिहाय पथके नेमलेली असतात त्याप्रमाणे डेब्रिजसाठी देखील पथके नेमावीत व बांधकामाचा कचरा, दगड-विटा माती लगेचच्या लगेच कसा उचलता येईल हे पाहावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply