नागपुरात निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला, सुदैवाने जीवितहानी नाही

नागपूर : २० ऑक्टोबर – कळमना मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या भारतनगर चौक परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. या भागात जवळपास सात गर्डर (पुलाला जोडलेले गेलेले भाग) लागले होते. एवढा मोठा भाग कोसळल्यानंतर या परिसरात एकच खळबळ माजली. विशेष म्हणजे हा पूल कोसळण्यापूर्वी नुकतेच एक कुटुंब या पुलाखालून जात होते. अशातच मोठी दुर्घटना टळली असली तरी एकूणच प्रकारात दुर्लक्षितेचा घोळ पुढे आला आहे. या घटनेची दखल घेऊन कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
शहरातील कळमना परिसरातील हा पूल पडण्यापूर्वी उपरोक्त दुचाकीस्वार कुटुंबीयांव्यतिरिक्त शहरातील नगरसेविका आभा पांडे यांची कारदेखील रवाना झाली होती. त्या भरतनगर येथील साई मंदिर परिसरातून दर्शन घेऊन निघाल्या होत्या. यादरम्यान त्यांची कार या पुलाखालून निघाली होती. पूल पार केल्यानंतर काहीच अंतरावर त्या असताना पूल जमीनदोस्त झाला. यात त्या थोडक्यात बचावल्या. त्यांच्या व्यतिरिक्त एक दुचाकीस्वारदेखील या पुलाखालून जात होता. तोदेखील थोडक्यात बचावला. दरम्यान, हा पूल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असून, त्याचे बांधकाम २0१४ पासून सुरू आहे. वर्ष २0१४ मध्ये पुलाच्या भूमिपूजनानंतर हे काम तीन वर्षात पूर्ण होणार होते. दरम्यान, अद्यापही हे काम प्रलंबित आहे. कळमना मार्केटकडे हा पूल जातो.
दरम्यान, या मार्गावरील भारतनगर चौकात सुरू असलेल्या या पुलाच्या बांधकामातील निमार्णाधीन एक भाग कोसळला. यात जवळपास ७ गर्डर होते. रात्री ८ च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय या परिसराला पोलिसांच्या तैनातीने छावणीचे स्वरूप आले आहे. पुलाचा हा भाग पडल्यानंतर या पुलाखालून जाण्यावरून नागरिकांमध्ये धास्ती वाढली आहे. कळमना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी सांगितले की, हा पूल एमबी टाऊन कळमना मार्केटशी जोडतो. मागील काही आठवड्यांपूर्वी पुलाच्या कार्यात गर्डर टाकण्यात आले होते. दरम्यान, पुलाचे इतर बांधकाम सुरू आहे. अचानक गर्डर खांबावरून घसरला आणि जमिनीवर कोसळला.

Leave a Reply