दोन महिन्यांआधी बेपत्ता झालेल्या महिलेचा सापडला मृतदेह

बुलडाणा : २० ऑक्टोबर – दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह बुलडाणा- खामगाव रोडवरील पोखरी फाट्याजवळ एका विहिरीत आढळला.
महिलेच्या पती आणि मुलीने कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुंदरखेड येथील मनिषा मुरलीधर इंगळे या महिलेचा असल्याचे समोर आले आहे. मनिषा इंगळे या २६ ऑगस्ट रोजी भादोला येथून बेपत्ता झाल्या होत्या.
यासंदर्भात बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल पोखरी फाट्याजवळ शेतात सोयाबीन सोंगणाऱ्या मजुरांना दुर्गंधी येत असलयाने त्यांनी पाहणी केली असता काठोकाठ तुडुंब भरलेल्या विहिरीत कुजलेला मृतदेह आढळला.
घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी नागरिकांनी विहिरी जवळ एकच गर्दी केली होती. मात्र केवळ मृतदेहाच्या हाडांचा सांगाडाच उरला होता. त्यामुळे मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply