सीआरपीएफच्या सायकल रॅलीचे अमरावतीत भव्य स्वागत

अमरावती : १९ ऑक्टोबर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दलाच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. अमरावती येथील राजकमल चौकात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी या रॅलीचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. रॅलीचे नेतृत्व केंद्रीय राखीव पोलिस दलातील असिस्टंट कमांडंट डॉ.चेतन शेलोटकर करत असून, रॅलीत राहुल भसारकर, सेकंड कमांडर मुकेश कुमार, कमांडर संजय बमोला, मुख्य वैद्यकीय अधिकारी शैलेंद्रकुमार व जवानांचा सहभाग आहे.
नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली ते गुजरात येथील केवडिया स्थित स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार या रॅलीने रविवारी गुरुकुंज मोझरी येथून प्रस्थान केले. ३१ ऑक्टोबरला वल्लभभाई पटेल जयंतीदिनी ही रॅली गुजरातमधील केवडीया येथे दाखल होणार आहे. यावेळी आमदार बळवंत वानखडे, महानगर पालिका विराधी पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली ठाकरे, संजय वाघ, अभिनंदन पेंढारी, नंदकिशोर कुईटे, सुरेश रतावा, मनोज भेले, हरिभाऊ मोहोड, वसंतराव साऊरकर, शोभा शिंदे, प्रदीप हिवसे, प्रशांत महल्ले, अनिल माधोगडीया, जयश्री वानखडे आदी उपस्थित होते.
रॅलीच्या माध्यमातून शारीरिक आरोग्य राखण्याबाबत संदेश, युवकांमध्ये खेळाप्रती जागरुकता निर्माण करणारे, पर्यावरणाचे रक्षण, देशाची अखंडता, देशप्रेम निर्माण करणे, राष्ट्रीय एकात्मता राखण्याबाबत संदेश देण्यात येत असल्याची माहिती रॅलीत सहभागी जवानांनी दिली. ही सायकल रॅली बारा ते तेरा जिल्ह्यांमधून जाणार असून जवळपास अकराशे किमी अंतर पार करणार आहे. रॅलीमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलातील ७६ जवानांचा समावेश असल्याची माहिती रॅलीच्या आयोजकांनी दिली.

Leave a Reply