संपादकीय संवाद – राष्ट्रीय स्तरावर स्थान निर्माण करण्यासाठी मनसेने हिंदुत्वाची कास धरणे गरजेचे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाच्या सोबत यावे आणि हिंदुत्व बळकट करावे अशी सूचना अयोध्येतील साध्वी कांचनगिरी यांनी केली आहे. साध्वी कांचनगिरी यांनी काल मुंबईतील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही सूचना केल्याची बातमी आहे. त्यानंतर पुढच्या महिन्यात राज ठाकरे हे अयोध्येत भेट देणार असल्याचीही बातमी आली आहे.
साध्वी कांचनगिरी यांची सूचना आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी उचललेले पाऊल या दोनही स्वागतार्ह घटनाच म्हणाव्या लागतील. भारत हा मूलतः हिंदूंचा देश म्हणून ओळखला जातो, आठव्या शतकापर्यंत या देशात हिंदूच मोठ्या संख्येने राहत होते. आठव्या शतकानंतर मुस्लिम आले, नंतर ख्रिस्ती आणि पारशीही आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात काँग्रेसने मात्र हा देश फक्त हिंदूंचा न ठेवता सर्वधर्मियांचा म्हणून घोषित केला, हे होत असताना हिंदू संघटित आणि सक्षम कधीच झाले नाहीत. त्यामुळे बहुसंख्य असूनही हिंदू समाज हा दुर्बल राहिला तर अल्पसंख्य समाजाची ताकद मात्र वाढतीच राहिली, परिणामी हिंदू समाजाला अनेकदा अन्यायही सहन करावा लागला.
गेल्या काही वर्षात मात्र हिंदू समाज जागृत झाला आहे, भारतीय जनता पक्षासारखा राजकीय पक्षही हिंदुहिताचा वसा घेत राजकारण करतो आहे. या पक्षाला मधली ३० वर्ष शिवसेनेने साथ दिली होती. मात्र आता सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने हिंदुत्वविरोधकांशी हातमिळवणी केली आहे, त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला पडला आहे.
राज ठाकरे यांची हिंदुत्वाशी कायम जवळीक राहिली आहे, त्यांचे काका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कडव्या हिंदुत्वाची पालखी वाहिली होती. अखेरपर्यंत त्यांनी हिंदुत्वाचा वसा जपला आता मात्र त्यांच्या मुलाने सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे. अश्यावेळी भाजप हा एकच पक्ष हिंदुत्वाच्या पालखीचा भोई म्हणून काम करतो आहे. हा मुद्दा लक्षात घेता राज ठाकरेंनी जर हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेत भाजपशी युती केली तर हिंदुत्वाची ताकद वाढेलच पण मनसेलाही राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकेल.
हा मुद्दा लक्षात घेत राज ठाकरे यांनी साध्वी कांचनगिरी यांच्या सूचनेवर गांभीर्याने विचार करावा अशी पंचनामाची सूचना आहे, यामुळे हिंदुत्वाची ताकद तर वाढेलच पण त्याचबरोबर भविष्यकाळात महाराष्ट्र निभावनिर्माण सेना ही राष्ट्रीय नवनिर्माण सेना बनण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल, मनसेच्या नेत्यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply