माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच, ते विधान अनावधानाने आले – चंद्रकांत पाटील

पुणे : १८ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने टीकेची झोड उठल्यानंतर आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आले आहेत. त्यानंतर माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे. अशा प्रकारे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसाचा अनादर करणं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही, ते विधान अनावधानाने आले असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 च्या वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी येथे यश मिळवून दाखवलं होतं. मी काय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीच्या कार्यक्रमात बोलत असताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरी उल्लेख आला. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर कधीच नाही. बांधाला बांध लागून आमचे काही भांडणही नाही. किंबहुना अनेक वेळा त्यांची स्तुती करत असताना मी सांगत असतो की प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे, मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व हिंदू संस्कृतीने शिकवले नाही.

Leave a Reply