प्रेयसीने दगा दिला म्हणजे प्रियकराला आत्महत्येस प्रवृत्त केले असे नाही – उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

नागपूर : १८ ऑक्टोबर – प्रेयसीनं प्रेमात दगा दिला म्हणजे प्रियकराला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं का? याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रेयसीनं प्रेमात दगा दिला म्हणजे तिने प्रियकराला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, असा त्याचा अर्थ होत नसल्याचं खंडपीठाने म्हटलं आहे. हा महत्त्वाचा निर्णय देताना नागपूर खंडपीठाने संबंधित तरुणीला दिलासा देत, तिच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरवला आहे. हा निकाल न्यायमूर्ती विनय देशपांडे आणि पुष्पा गणेडीवाला यांनी दिला आहे.
याचिकाकर्त्या तरुणीचं २०१८ पासून प्रणय मोरे नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवस प्रेमसंबंधात राहिल्यानंतर, याचिकाकर्ती तरुणी एअर हॉस्टेसच्या ट्रेनिंगसाठी लखनऊ येथे गेली होती. याठिकाणी गेल्यानंतर तिचं अन्य एका मुलासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय प्रणयला आला. यावरून दोघांत भांडण झालं. संबंधित मुलीनं आपलं कोणत्याही दुसऱ्या मुलासोबत प्रेम नसल्याचं प्रणयला समजावून सांगितलं होतं. पण प्रणयचं समाधान झालं नाही.
दरम्यान, १२ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेयसी लखनऊ येथे एअर हॉस्टेसची मुलाखत देऊन नागपुरला परतली होती. लखनऊवरून नागपुरात येताच प्रियकर प्रणय तिला कळमेश्वर येथे आपल्या खोलीवर घेऊन गेला. लांबचा प्रवास करून थकल्याने तरुणी आपल्या प्रियकराच्या रुमवर झोपली. ती गाढ झोपेत असताना, प्रणयने त्याच खोलीत गळफास घेत आत्महत्या केली.
यामुळे कळमेश्वर पोलिसांनी २३ जानेवारी २०२१ रोजी संबंधित मुलीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे याचिकार्त्या तरुणीने संबंधित एफआयआर विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. तसेच याचिकाकर्त्या तरुणीला दिलासा देत, तिच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्दबातल ठरवला आहे.

Leave a Reply