सिलेंडरचा स्फोट होऊन घरगुती साहित्य खाक

अमरावती : १७ ऑक्टोबर – सिलेंडरचा स्फोट होऊन घरगुती साहित्य खाक झाल्याची दुर्दैवी घटना नांदगाव पेठ नजीकच्या कठोरा बु. येथे घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन विभागाच्या समयसुचकतेमुळे मोठी अग्नीघटना टळली.
राणी वानखडे ही महिला आपल्या परिवारासह कठोरा बु. येथे वास्तव्यास असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी घराच्या मागच्या बाजूने आग लागली व ही आग वानखडे यांच्या घरातील सिलेंडरपर्यंत पोहचली व क्षणार्धात मोठा स्फोट झाला. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दल व पोलिसांना दिली. अग्निशमन दलाने लगेच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.
घटनेमध्ये घरातील सर्व साहित्य व पैसे देखील जळून खाक झाले. या अग्नितांडवामुळे राणी वानखडे यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळी सरपंच मंगेश महल्ले, ग्रा.पं सदस्य विनोद भालेराव, किरण महले, अर्जुन युवनाते दाखल झाले व वानखडे परिवाराला मदतीचा हात दिला.

Leave a Reply