प्रकाश आंबेडकरांनी दिला नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांना मोलाचा सल्ला

नागपूर : १७ ऑक्टोबर – मोठी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय झाले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोलाचा सल्ला दिलाय. आजारपणामुळे पक्षाच्या दैनंदिन कामातून प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आज शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही आंबेडकर यांची भेट घेतली होती.
नवाब मलिक किंवा त्यांचे जावई समीर खान एनसीबीच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करत नाहीत. त्यामुळे सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत सुरु असलेल्या धाडसत्रात कोण डागाळलेलं आणि कोण धुतल्या तांदळाचं आहे हे कळत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच सध्या केंद्रीय एजन्सीमार्फत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संबंधित असलेल्या लोकांवर धाडसत्र सुरु आहे. मात्र, अशा धाडी अनेकवेळा निष्कर्षापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे हे धाडसत्र राजकीय हेतूने केले जात आहे का? अशी शंका उपस्थित होत असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलंय.
राज्यातील काही मंत्र्यांनी वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर सुरु केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. फडणवीसांनी याबाबत पुरावे सादर केले पाहिजेत. राजकारणात खळबळ निर्माण करण्यासाठी कुणीही असे आरोप करु नये. कारण काही दिवसांनी लोक अशा आरोपांना करमणूक समजून गांभीर्याने घेत नाहीत, असा सल्ला आंबेडकर यांनी फडणवीसांना दिलाय. केंद्रीय तपास यंत्रणा जर कुठे धाड टाकत असतील तर त्या धाडीबाबतची माहिती आणि पुढील कायदेशी कारवाई निश्चित कालावधीत न्याय यंत्रणा आणि जनतेसमोर नेली जावी, अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलीय.

Leave a Reply