पक्षविरोधी कारवायांवरून आशिष देशमुख यांना पक्षाने बजावली नोटीस

नागपूर : १७ ऑक्टोबर – ‘पक्षविरोधी कारवायांरून निलंबित का करण्यात येऊ नये’, अशी नोटीस प्रदेश काँग्रेसने सरचिटणीस डॉ. आशिष देशमुख यांना बजावली. या नोटीसने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला असला तरी, हे अपेक्षित असल्याचे मानले जाते.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून शनिवारी ही नोटीस बजावण्यात आली. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्याची सूचना केली आहे. विहित नमुन्यात खुलासा न आल्यास शिस्तभंग केल्याबद्दल पक्षातून बडतर्फ करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले.
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार व आशिष देशमुख यांच्यातील वाद अलीकडेच उफाळून आला. यानंतर देशमुख यांनी जिल्हा बँकेचे प्रकरण चव्हाट्यावर आणले तर, एका गटाने थेट पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारांना जाहीर समर्थन देऊन प्रचार केल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आली. यावर कार्याध्यक्ष व विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखालील समितीने चौकशी केली.
‘हंडोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन समज दिल्यानंतर आपल्या भूमिकेत कुठलीच सुधारणा झाली नाही. अशा कृतींमुळे पक्षांतर्गत वातावरण दूषित होत असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आठ दिवसांत खुलासा करावा’, असे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे. देशमुख यांना नोटीस मिळाली. त्यांची भूमिका मात्र कळू शकली नाही.

Leave a Reply