देवीच्या दर्शनाला निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात, एक ठार तर तीन जखमी

भंडारा : १७ ऑक्टोबर – देवीच्या दर्शनाकरिता डोंगरगड येथे निघालेल्या तरुणांची भरधाव कार झाडावर आदळून मोहाडी तालुक्यातील एक तरुण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. रुपचंद पचघरे (३६) रा.निलज/बु. असे मृतकाचे नाव आहे. तर संतोष महादेव पचघरे (२६), अक्षय माटे (२६), गुड्डू कांबळे (३०), निलेश बांते सर्व रा.निलज अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
मोहाडी तालुक्यातील निलज येथील पाच मित्र कारने छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथे बम्लेश्वरी मातेच्या दर्शनाकरिता निघाले होते. दरम्यान दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तुमसर च्या पुढे काही अंतरावर कार भरधाव असताना सरांडी गावाजवळ कारवरून चालकाचे नियंत्रण सूटले.
यावेळी कार रस्त्याच्या खाली शेतातील एका झाडावर आदळली. यात रुपचंद पचघरे याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार मित्र गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिक व शेतमजूरांनी जखमींना उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. येथे प्रथमोपचारानंतर संतोष पचघरे, अक्षय माटे, गुड्डू कांबळे या तिघांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर निलेश बांते याला गोंदिया येथे पाठविण्यात आल्याचे समजते.

Leave a Reply