त्यांची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा! – संजय राऊत

सिल्वासा : १७ ऑक्टोबर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर जोरदार टीका सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले. ते आज सिल्वासामध्ये बोलत होते.
‘काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते ही राज्याची परंपरा नाही आम्ही मोदी साहेबांचा उल्लेख किंवा अमित शाह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले आहेत. आडवाणी यांना आजही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा कायम आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी आणि पराभव करावा हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले…तुम्ही काल राजकारणात आलेली लोक शरद पवार यांचा उल्लेख एकेरी करता म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणे गरजेचे…मेडिकल आणि नार्को पद्धतीने सुद्धा!’, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी ६० वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.
मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सध्या सिल्वासामध्ये आहेत. त्यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘दादरा – नगर हवेलीत प्रशासक ठरवतो कोणी कोणत्या राजकीय पक्षाचे काम करायचे ते. जसे आमच्या महाराष्ट्रात राज्यपाल ठरवतात. तुम्ही आमच्या पक्षाचे नाहीत, मग तुमच्या फायलींवर मी सही नाही करणार, हा एक नवीन प्रथा पायंडा सुरू झालाय’, अशी टीका राऊतांनी केलीय.

Leave a Reply