जम्मू-काश्मीर व लद्दाखच्या नागरिकांप्रति आपलेपणाची, एकत्वाची भावना अधिक दृढ हवी – डॉ. मोहन भागवत

नागपूर : १७ ऑक्टोबर – जम्मू-काश्मीर व लद्दाखच्या नागरिकांप्रति आपलेपणाची, एकत्वाची भावना अधिक दृढ हवी व त्यासाठी प्रत्येक भारतीयाला योगदान द्यावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
‘आधुनिक लद्दाखचे निर्माता एकोणिसावे कुशोग बकुला’ तसेच ‘जम्मू-कश्मीर : ऐतिहासिक परिप्रेक्ष्य में धारा ३७० के संशोधन के उपरान्त या पुस्तकांचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते चिटणवीस सेंटरमध्ये झाले. पहिले पुस्तक लेखिका हेमा नागपूरकर यांनी लिहिले आहे. रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. प्रचार प्रमुख अरुणकुमार यांच्या नागपुरात झालेल्या व्याख्यानाचा डॉ. अवतारकृष्ण रैना यांनी केलेला हिंदी अनुवाद म्हणजे दुसरे पुस्तक. हेमा नागपूरकर व डॉ. रैना यांचा सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लद्दाख, जम्मू-काश्मीर अध्ययन केंद्रातर्फे आयोजित या कार्यक्रमाला केंद्राच्या अध्यक्षा मीरा खडक्कार, सचिव अभिनंदन पळसापुरे व्यासपीठावर उपस्थित होते.
एकोणिसावे कुशोग बकुला यांच्या जीवनचरित्रावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रकाश टाकला. जम्मू-काश्मीरबद्दल ते म्हणाले की, ३७० कलम निष्प्रभ झाले, हे चांगले झाले असले तरी संकट टळलेले नाही. ज्या कारणाने ते आले तेच संकट आहे. तीन प्रवाह दिसतात. त्यातील एक प्रवाह आहे दहशतवादाचा. पाकच्या संगनमत व चिथावणीने कट्टर सांप्रदायिक भेद मनात ठेवून त्या आधारे काश्मीरला भारतापासून वेगळे करणे, पाकची इच्छा आहे की काश्मीर आपल्या आधिपत्याखाली यावे. त्यातील लोक म्हणतात ‘आझादी’, हा दुसरा प्रवाह संपलेला नाही.
तिसरा मोठा वर्ग आहे की, जो भ्रष्टाचारी लोक कारागृहात जाण्याने तसेच विकास शेवटपर्यंत पोहोचतो म्हणून खुश आहे. २०२४ पर्यंत केंद्र सरकार बदलू शकत नाही म्हणून त्यासोबत आहे. लोकांच्या सुखात सुख मिळवून बोलतो, पण ‘स्वतंत्र झालो तर चांगलेच आहे’, अशी मनात अढी असलेला. समस्या इथेच आहे. आणखी एक प्रवाह लहान असला तरी संख्येने मोठा आहे. संख्या एवढी की काहीही करू शकतो. भारताची राष्ट्रीयता हीच आपली राष्ट्रीयता आहे, त्यासोबत आपल्याला राहायचे आहे. त्यातही तरुण पिढी चांगल्या संख्येने आहे, असे ते म्हणाले.
प्रारंभी अहल्या मंदिर छात्रावासातील भगिनींच्या मंत्रोच्चारात दीप प्रज्वलन झाले. अभिनंदन पळसापुरे यांनी प्रास्ताविकात केंद्राची माहिती दिली. ‘मातृमंदिर का समर्पित दीप मैं’ हे गीत अमर कुळकर्णी यांनी सादर केले. सूत्रसंचालन डॉ. प्रगती वाघमारे यांनी केले. आभार सागर मिटकरी यांनी मानले. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, आ. परिणय फुके, खादी ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य जयप्रकाश गुप्ता, माजी आ. प्रा. अनिल सोले, द. म. क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply