आणि देवाची कवाडं उघडली… – माधव पाटील

जीव हा वेडापिसा झाला,
विठ्ठला कसा कुठं तू रमला…”

काहीसे वैतागून अंतरीची ही तळमळीची हाक देता देता शेवटी देवाची कवाडं उघडली. आम्ही म्हणू ती वेळ हा जणू नियतीचा (!) खेळ तमाम भक्तांनी गेल्या नऊ महिन्यांपासून अनुभवला. काय तर म्हणे फक्त आणि फक्त भक्त लोकांपासून कोरोना महामारी संभव आहे. या संभवाला संशय ठरवून मायबाप सरकारने आजवर महाराष्ट्रातल्या समस्त देव देवतांपासून भक्त संप्रदायाला दूर ठेवले. त्यामुळे भक्तांनी मोठ्या कष्टाने घराच्या चार दिवारीतूनच देव पुजला. कुणाचा देव, कुणाचं दैवत, कुणाचा नवस जागीच राहिला. गेल्या दोन वर्षांपासून विठ्ठलाची पायी वारी थांबली. राज्यातील श्री तुळजाभवानी, श्री महालक्ष्मी, श्री रेणुका आणि श्री शृंगदेवी ही साडे तीन शक्तीपीठांपासून तर थेट ग्रामीण स्तरावरील ग्रामदैवतं यांना भक्त पोरके झाले. शंभर सव्वाशे वर्षांनंतर हा प्लेग-महामारी सदृश नव्यानं संसर्गजन्य असा कोरोना रोग आला अन् झटपट माणसाच्या जीवावर स्वार झाला. श्वास, संभाषण, स्पर्श आणि आत्यंतिक जवळकीने माणूस पुरता घेरल्या गेला. त्यातूनच या महाभयानक काळात बोलण्या-वागण्या-रहाण्याची त्रिसूत्री जन्माला आली. माय मराठीच्या विश्वात लॉक-अनलॉक सारख्या इंग्रजाळलेल्या शब्दांचा बोलबाला सुरू झाला. कोरोनाने अत्र तत्र सर्वत्र उच्छाद मांडला अन् पाहता पाहता चालत्या बोलत्या माणसाचा श्वास घराच्या चार दिवारीत बंदिस्त झाला. मनशुद्धीसाठी आत्मा आणि मन या दोहोत सदैव सुसंवाद हवा म्हणून आपल्या संतांनी दिलेला नामस्मरणाचा मंत्र भक्त-भाविकांना प्रकर्षाने आठवला. ‘देव नाही देव्हाऱ्यात, देव नाही देवालयी’ हा भाव भक्तांच्या हृदयात जागा झाला. तिकडे मंदिरांची दारे कुलूपबंद झाली. सरकारी लॉकडाऊनचा अंमल सुरू झाला. आम्ही जिंकलो या आविर्भावात सरकार वागू लागले. पण देव आणि त्यावर श्रद्धा असलेल्या लाखो भाविकांची होणारी ताटातूट त्यांना काय कळणार बरे ? शरीरापेक्षा मनाला झालेल्या जखमा आणि वेदना त्रासदायक असतात.
कुछ जख्म ऐसे है वो दिखते नही।
मगर, ये मत समझिये वो दुखते नही।
जनतेनेही सरकारी आदेशाचे पालन केले. हळूहळू या कोरोनाची मस्ती कमी झाली. आज ती आटोक्यात येण्याच्या बेतात आहे. सारे कसे हसत खेळत मोकळे झाले, फक्त मंदिरे त्यातले देव आणि त्यावर श्रद्धा ठेवणारे लाखो भाविक या लॉकडाऊनच्या जंजाळात अडकले. भक्तांचा संताप अनावर तर श्वास वरखाली झाला. देव्हाऱ्याची कुलूपं उघडली खरी पण माथा देवापुढं टेकला जाईल तेव्हाच ना. आजहि अनेक ठिकाणी ऑनलाईन दर्शन, दुरून दर्शन, फुल नको, फळ नको की पान नको. ते एक तर पोटी ठेवा नाहीतर ओठी ठेवा. देवाला ओटी भरता येणार नाही. त्यातहि भेदभाव अन् तोहि देवाच्या द्वारी कुणी पहिला काय ? काय दिवस आले मेले, १० वर्षाखालील आणि ६५ वर्षांवरील भक्तांना प्रवेशबंदी. काय काय नियम भक्तांच्या बोकांडी बसतील याचा नेम नाही. आता नेम करायचा, धरायचा तो एकच जमलं तर देवाचे पहावे रूप नाहीतर आठवावे रूप. नामस्मरणाशिवाय दुसरं समाधान नाही दोन्ही हात जोडुनिया भक्त म्हणे…
तुझे रूप चित्ती राहो,
मुखी तुझे नाम…
देह प्रपंचाचा दास,
सुखे करो काम…

– माधव पाटील

Leave a Reply