भारतात लोकसंख्या नीती नव्याने निर्धारित करा – डॉ. मोहन भागवत यांची सूचना

नागपूर : १५ ऑक्टोबर – भारतात लोकसंख्या नीती नव्याने ठरवली जावी अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन महोत्सवात बोलताना केली. यावर केंद्र सरकारने तत्काळ विचार करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन केले जावे असेही त्यांनी सुचवले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी निमित्त होणाऱ्या शस्त्रपूजन समारोहाचे आयोजन आज नागपुरातील रेशीमबाग मैदानावर करण्यात आले होते, त्यावेळी मोजक्या स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ. भागवत बोलत होते. यावेळी संघाचे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व्यासपीठावर उपस्थित होते. रेशीमबाग संघस्थानावर जरी मोजके स्वयंसेवक उपस्थित असले तरी नागपुरात ४८ ठिकाणी एकत्रित येऊन शहरातील स्वयंसेवक आभासी पद्धतीने मोठ्या संख्येत समारंभात सहभागी झाले होते.
यावेळी बोलतांना डॉ. भागवत म्हणाले की आज जनसंख्येचे असंतुलन ही समस्या झाली आहे. या संदर्भात संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१५च्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ठराव पारित केला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सामान नियम नसल्यामुळे काही जमातींची संख्या वाढते आहे, तर काहींची घटते आहे. असे सांगून आजचे तरुण उद्या म्हातारे होतील त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी नवी तरुणाई राहील काय? याचा विचार व्हायलाच हवा असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या सुमारे ७० मिनिटांच्या भाषणात सरसंघचालकांनी देश आणि समाजासमोरील विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला. देशातील ड्रग्जचं व्यसन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून तरुणाईला बहकवण्याचा होत असलेला प्रयत्न यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. सरकारला ड्रग्ज व्यसनांचं पूर्ण निर्मूलन करावं लागेल, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील निर्मितीवरही निशाणा साधत त्यावर नियंत्रणाची मागणी डॉ भागवत यांनी केली.
मोहन भागवत म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या आधारावर नवनव्या गोष्टी येत आहेत. या गोष्टी आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाही. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येतं? आता करोना काळात तर लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आलाय. ऑनलाईन काय पाहायचं, काय नाही याचं काहीच नियंत्रण नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काय दाखवायचं याचंही नियंत्रण नाही.”
देशात वेगवेगळ्या नशेचे पदार्थ येतात त्याचं व्यसन वाढत आहे. ते कसं रोखायला हवं हे माहिती नाही. उच्च वर्गापासून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत भयंकर व्यसनाचं प्रमाण आहे. या नशेच्या पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा कुणाच्या हातात जातो हे सर्वांना माहिती आहे. देशविरोधी कामात त्याचा उपयोग होतो. सीमेपलिकडील देश या नशेच्या पदार्थांच्या व्यापाराला प्रोत्साहन देतात. असं सर्व सुरू आहे,” असं भागवत यांनी सांगितलं.
यावेळी मोहन भागवत यांनी बिटकॉईनवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बिटकॉईन सारखं चलन आहे. त्यावर कोणत्या राष्ट्राचं नियंत्रण आहे हे मला माहिती नाही. त्यात स्पर्धा तयार होते आहे. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवणं, समाजाच्या हितासाठी चालवणं, ड्रग्ज सारख्या व्यसनाचं पूर्ण निर्मूलन होईल यासाठी प्रयत्न सरकारने करायला हवेत. त्यांना हे करावं लागेल. परंतु शासन त्यांचं काम आज नाही उद्या करेल. तसं करण्याचा प्रयत्न करतही आहे. ते आज ना उद्या यशस्वी होतील. परंतु मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. समाजाचं मन तयार व्हायला पाहिजे. बालकाचं मन घरात तयार होतं.” त्याच्यावर त्या वयातच संस्कार व्हायला हवे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आसाम आणि मिझोराममधील पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून डॉ भागवत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “एकाच देशात आपल्याच दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “दोन्ही भारताचेच राज्यं असूनही त्या दोन राज्यांचे पोलीस एकमेकांविरुद्ध युद्ध करतात. गोळीबारात लोक मारले जातात. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत की काय आहोत? आपल्या राजकीय स्पर्धेतून आता सरकारांमध्येच विरोध होतोय. पक्षांचा विरोध असेल तर चालेल, पण सरकारी व्यवस्था तर एक आहे, संविधानानुसार ही व्यवस्था निर्माण झालीय. संविधानानुसार आपण संघराज्य आहोत.” याचे भान ठेवायला हवे असे त्यांनी ठणकावले.
“आपण एक देशाचे लोक आहोत, आपल्या सर्वांचा एकच देश आहे. व्यवस्था संघराज्य आहे, लोक संघराज्य नाही. सर्व लोक एक आहेत, एक राष्ट्र आहेत. मात्र, असं पोषक वर्तन सत्तेत बसलेल्या लोकांचंही होताना दिसत नाही. मग समाजाला कुठून दिशा मिळेल? आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असाच छळकपट सुरू असतो. त्यात समाजाच्या मनाचं काय होणार?” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
“हे वर्ष आपल्या स्वातंत्र्याचं ७५ वं वर्ष आहे. १५ ऑगस्ट १९४७ आपण स्वतंत्र झालो. आपण आपला देश पुढे नेण्यासाठी देशाची सूत्रं हाती घेतली. हे एका रात्रीतून मिळालेलं नाही. स्वतंत्र भारताचं चित्र कसं असावं हे भारताच्या परंपरेनुसार समान कल्पना मनात ठेऊन देशाच्या सर्व जातीवर्गातील वीरांनी तपस्या, त्याग आणि बलिदानाचे हिमालय उभे केले.” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
“भारत सर्वांचीच मातृभूमी आहे. भारत नेहमीच एक राष्ट्र राहिला आहे. सर्व विविधतांचा स्वीकार, सन्मान करण्यात येतो. आक्रमणकारी लोकांसोबत दोन धर्मसंस्कृती देशात आल्या. त्यांच्यासोबत आता कुणाचेच नाते नाही. सर्व लोक हिंदू पुर्वजांचेच वंशज आहे. त्यांची सर्वांची मातृभूमीदेखील भारतच आहे. काही लोकांनी फुटीरवादी भावना सोडण्याची गरज आहे. असे झाले तरच देशाची एकात्मता व अखंडता परत येईल
दरम्यान, आजही देशात हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि अशा लोकांनी युतीही केली आहे, मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, हिंदू समाजाला विभाजित ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न सुरू आहेत. म्हणूनच भारताचा आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींचा निषेध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातच हल्ला करण्याचे प्रयत्न आहेत. जर हे बळकट झाले तर आपण धावू शकणार नाही या भीतीमुळे भारतात हे हल्ले चालू आहेत. अशा लोकांनी युती केली आहे.’ अशी टीका त्यांनी केली.
भारतीय संस्कृतीची आणि परंपरांची जपणूक करतानाच कालसुसंगत चालण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. भारतातील स्वदेशी ज्ञान हे सर्वतोपरी आहे, असे सांगतांना जगात जे नवे काही येते आहे त्याचाही गरजेनुसार अंगीकार करावा असे त्यांनी सांगितले. स्वदेशीला कालसुसंगत बनवा आणि विदेशीला देशसुसंगत बनवून वापरात आणा ही आजची खरी गरज असल्याचे डॉ. भागवत म्हणाले.
रेशीमबाग संघस्थानावर झालेल्या कार्यक्रमात फक्त २०० स्वयंसेवक आणि निवडक मान्यवर उपस्थित होते, त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रसेवीका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का सरकार्यवाहीका अन्नदानम सीता, इस्राईलचे वाणिज्यदूत कोब्बी शोशानी यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश होता. याचवेळी शहरातील ४८ संघस्थानांवर आभासी पद्धतीने शहरातील नागरिक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते.

Leave a Reply