बेपत्ता तरुण तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने उडाली खळबळ

बुलडाणा : १४ ऑक्टोबर – गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुण आणि तरुणीचा मृतदेह काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी पिंपळगाव गावाच्या बाहेर एका विहिरीत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढले. यावेळी ग्रामस्थांनी सुद्धा याठिकाणी मोठी गर्दी केली होती. मात्र या दोघांनी आत्महत्या केली किंवा काही घातपात झालाय का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध होते, असं गावकरी दबक्या आवाजात बोलत आहेत.
खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथील प्रमोद ऊर्फ सुरेश भांबळकर आणि दुर्गा सावरकर हे दोघेही 11 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात दोघेही हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्या दोघांचा शोध सुरु असताना काल (13 ऑक्टोबर) सायंकाळी एका विहिरीत दोघांचा मृतदेह आढळळा. पिंपळगाव राजा येथील शेतकरी विठ्ठल पाटील हे शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत तरुण-तरुणीचे मृतदेह तरंगताना दिसले.
शेतकरी विठ्ठल पाटील यांनी तातडीने पोलिसांना संपर्क करुन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. तर विहिरीच्या बाजूला एक दुचाकी सुद्धा अपघातग्रस्त अवस्थेत आढळल्याने या प्रकरणाचे गौडबंगाल वाढले आहे. हा घातपात आहे की आत्महत्या? हे अजूनही स्पष्ट झाले नाहीय. पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणाचा उलगडा होईल. मात्र या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे ग्रामस्थ दबक्या आवाजात बोलत आहेत.

Leave a Reply