पुण्यतिथी निमित्त दत्ताजी डिडोळकरांना विनम्र आदरांजली – किशोर पौनीकर

मुले पळवणारा माणूस!

कोणत्याही प्रिय व्यक्तीचे पुण्यस्मरण आपल्याला नेहमीच होत असते, मात्र त्याच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी त्याचे हटकून स्मरण होतेच. आज अशाच एका पुण्यात्म्याचे स्मरण घडतेय ते म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दत्ताजी डिडोळकर! आज १४ ऑक्टोबर म्हणजे दत्ताजींची पुण्यतिथी त्यानिमित्ताने त्यांचे पुण्यस्मरण करतांना त्यांच्या आठवणी मी आपल्याशी शेयर करतो आहे.

14 oct dattaji didolkarदत्ताजींना मी अभाविप चे म्हणतोय कारण त्यांचा माझा संबंध अभाविप मुळेच आला. पण या व्यक्तिमत्त्वाला कुठल्या संघटनेच्या नावाने ओळखणे हे त्यांच्या विशालतेला बंदिस्त करणेच होय!
या देशाला बलशाली बनवायला हिन्दूंचे संघटन आवश्यक आहे, हे लक्षात घेवून डाॅक्टर हेडगेवारांनी सांस्कृतिक राष्ट्रवाद ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हा विचार व हे संघटन आसेतू हिमाचल संपूर्ण भारतात पोहचवायला नागपूरातून कोणी शिकायला म्हणून अन्य प्रदेशात गेले तर कोणी शिक्षण आटोपल्यावर प्रचारक म्हणून अन्य प्रदेशात गेले. आपले जीवन राष्ट्रवेदीवर अर्पण करायची अहमहमिकाच लागली होती. स्वातंत्र्या पुर्वीच्या याकाळात जिथे देशाकरता जीव देण्याची परंपरा होती तिथे या प्रवाहाला मोडून देशाकरता, देशाला परम वैभवाच्या शिखरावर बसवण्या करता रक्ताचे नव्हे घामाचे सिंचन करण्याचे स्वप्न बघत एक एक जण घराबाहेर पडत होता….
स्वर्गीय दत्ताजी डिडोळकर हे त्यातलेच.
स्व दत्ताजींना संघाच्या कामासाठी केरळ प्रांत मिळाला. भारताच्या सीमावर्ती भागात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी फार पुर्वीपासूनच जाळे विणून ठेवलेले आहे. धर्मांतर करत करत राष्ट्रांतर करावे, हेच त्यांचे ध्येय धोरण. केरळही याहून अलग नव्हता.
सागरी किनारा असल्याने मासेमारांची वस्ती व यांच्याच वस्त्याच्या वस्त्या ख्रिश्चनांनी बाटवलेल्या. अशावेळी हिन्दूत्वाचे जागरण करत मनामनांत राष्ट्रज्योत जागृत करणे हा पोरखेळ नव्हताच! पण तरीही संघ शाखांमध्ये पोरांचे खेळ घेत घेत दत्ताजींनी प्रतिकुल परिस्थितीत आपले बस्तान तिथे बसवले.
ख्रिश्चनांनी त्या भागातील हिन्दू प्रतिकांना बाटवणेही सुरू केलेले होते. वेदांची युगानुकूल उकल करुन विश्वबंधुत्वाचे प्रतिपादन करणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी सागर किनारी ज्या शिलाखंडावर तप केले होते व जगन्मातेने त्यांना दर्शन दिले होते, त्या शिलाखंडावरही ख्रिश्चनांनी मोठा क्राॅस लावला होता. दत्ताजींनी व अन्य स्वयंसेवकांनी अनेक वेळा तो क्राॅस काढून तिथे भगवा ध्वज स्थापित केला. पण ख्रिश्चन मासेमार तिथे जावून तो झेंडा काढून पुन्हापुन्हा क्राॅस लावत. अशाच एका रात्री तो क्राॅस हटवायला दत्ताजी व अन्य पाच स्वयंसेवक गेले असता त्यांना जवळपास पन्नासावर ख्रिश्चन मासेमारांनी घेरले. प्रसंग बाका होता. दत्ताजींना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती पण सोबतच्या स्वयंसेवकांची जबाबदारीही त्यांच्यावर होती. त्यांनी जोरात गर्जना केली…. आम्ही मरू तर मरू पण त्या पहिले आमच्यातील प्रत्येकजण तुमच्यातील चार पाच जणांना मारूनच मरेल. बोला कोणाला पहिले मरायचे आहे? ” हातघाईवर आलेल्या प्रसंगातही दत्ताजींचे प्रसंगावधान काम करून गेले. त्या मासेमारांनी बाजूला होत या सहा जणांना जायला जागा करून दिली.
स्व दत्ताजींनी विवेकानंदांचा तो शिलाखंड संघर्ष करत करत राखला. पुढे या शिलाखंडावरच विवेकानंद शिलास्मारक बांधले गेले. व विवेकानंद केंद्र या संस्थेचा उदय झाला.
दत्ताजींच्या थोरल्या भावाचे अकाली निधन झाल्याने तीन लहान लहान पुतण्यांचा सांभाळ करायला दत्ताजींना नागपूरला वापस यावे लागले. घरी राहू लागल्यावरही त्यांनी लग्न करून संसार थाटला नाही. संघ कार्य हेच जीवन हे व्रत त्यांनी आयुष्यभर सांभाळले.
१९४८ ला गांधीवधानंतर संघावर अन्यायपूर्ण बंदी आली होती. याचा संघटित विरोध करायला युवकांचे संघटन होणे गरजेचे होते. हा विचार करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. या प्रक्रियेत दत्ताजी डिडोळकर व दत्तोपंत ठेंगडी यांचा प्रमुख सहभाग होता.
व्यक्तिगत उपार्जन करायला व युवकांमध्ये राहायला मिळावे म्हणून दत्ताजींनी मोहता सायंस काॅलेज मध्ये काही काळ नौकरीही केली. पण नंतर नौकरीचा राजिनामा देवून त्यांनी ‘जयंत ट्यूटोरियल्स’ या नावाने स्वतःचे ट्युशन क्लासेस काढलेत व नावारुपालाही आणले.
विद्यापीठातील गतिविधींवर राष्ट्रीय विचारांचा प्रभाव राहावा म्हणून दत्ताजींनी ‘विद्यापीठ शिक्षण मंचाची’ स्थापना केली. या माध्यमातून नागपूर विद्यापीठ दत्ताजींनी गाजवून सोडले होते.
१९८९ ला झालेल्या डाॅक्टर हेडगेवार जन्मशताब्दी कार्यक्रमाच्या समितीचे ते अखिल भारतीय सचिव होते.
दत्ताजींना गप्पा करणे फार आवडायचे. स्वतः कट्टर संघ स्वयंसेवक असूनही त्यांच्या मित्रमंडळात काँग्रेसचे कार्यकर्ते, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. काँग्रेसचे गेव्ह आवारी, कम्युनिस्ट पक्षाचे ए बी बर्धन तर त्यांच्याकडे भरपूर वेळा दिसत. दत्ताजींकडे कोणीही व केंव्हाही जा, त्याला कच्चा चिवडा ते आग्रहाने खावू घालायचे. घरी आलेल्या प्रत्येकाची ते आपल्या वहिनींशी ओळख करून देत व जातांना, “वहिनींना सांगूनच जा!” असे आवर्जून सांगत.
वयाची साठी पार केल्यावरही दत्ताजी नागपूरच्या कुठल्याही गल्ली बोळात स्कुटर ने फिरतांना दिसायचे. सतत संपर्क व कायम कल्पक संघटनात्मक कार्यात ते व्यस्त असत. कदाचित ते त्या शिवाय राहूच शकत नसत, असेच म्हणायला हवे.
श्री नितिन गडकरी पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत असतांना वर्धेला काही विशिष्ट मोर्चेबांधणी करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आले. त्याकाळी फोनची सुविधा फार कमी लोकांकडे होती. त्यामुळे रात्री नऊ वाजता नागपूरहून स्कुटर ने एकटेच निघून ते रात्री अकरा वाजता वर्धेला भुपेंद्र शहाणें कडे गेले होते. चर्चा आटोपल्यावर भुपेंदच्या रात्री घरी राहण्याच्या आग्रहाला डावलून ते रात्रीच तडक घरी पोहचले होते. त्याकाळी वर्धा रोड हा दुहेरी नव्हता. समोरून चारचाकी वाहन आले दुचाकी स्वाराला रस्त्यावरून खाली उतरावे लागे. त्यात रस्त्यावर गढ्ढे आहेत वा गढ्यांमध्ये रस्ता आहे, असा प्रश्न पडावा असा तो होता. यावरून दत्ताजींचा साहसी स्वभाव लक्षात यावा.
गरजवंताला मदत करणे हाही त्यांचा जणू छंदच होता. कितीतरी जणांना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. कोणी पैसे वापस दिलेच तर ते त्याच क्षणी अन्य कोणा गरजवंताला देवून टाकत. वक्तृत्वाचे वरदान स्व दत्ताजींना लाभलेले होते. ते भाषणाला उभे राहिले की टाळ्यांनी सभागृहच नव्हे तर परिसरही दणाणून जायचा.
बोलण्यातील अघळपघळपणा व ठराविक कालांतराने तंबाखूचा बार भरणे हे दत्ताजींचे ठळक वैशिष्ट्य होते. त्यांच्याघरी कच्चा चिवडा खातांना ते सहजच बोलून जात, “खातांना लाजू नका बे! बापाचा माल समजून खा!” दत्ताजी जिथेही असत, हास्याच्या फैरी झडत असत.
“मी संघाचा स्वयंसेवक आहे वा अभाविप चा कार्यकर्ता आहे, म्हणजे काहीतरी अलग आहे, असे नव्हे. मला समाजात मोकळेपणाने वावरता यायला हवे, हेच आपल्या स्वयंसेवकत्वाचे वा कार्यकर्तेपणाचे गमक आहे.” हे ते आवर्जून सांगत.
दत्ताजींकडे केंव्हाही जा, ते एकटे कधीच नसत. सतत कोणीतरी त्यांच्याकडे तत्वज्ञानात्मक चर्चा करायला, संघटनात्मक कसब शिकायला वा अघळपघळ गप्पा मारायला आलेला असायचा. यात युवकांची भरणाही लक्षणीय असायची. दत्ताजींच्या एक एक शब्दात ते जीवनाची दिशा शोधत. यातीलच अनेकजण अलग अलग संघटनांचे प्रचारक निघत. यामुळेच दत्ताजींच्या शिवाजी नगरातील “केदार” बंगल्याला वाघाची गुहा म्हणत, जिथे केवळ जाणाऱ्यांचीच पावलं दिसत, वापस येणाऱ्या पाऊलांचे ठसे तिथे नसतच. याच कारणाने अनेकजण त्यांना ‘मुलं पळवणारा माणूस’ म्हणत.
१४ आक्टोबर १९८९ ला नागपूर अभाविप ने यशवंत स्टेडियम ला चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला श्रीराम शिला पुजनाचा कार्यक्रम घेतला होता. त्यात दुपारच्या सत्रात स्व दत्ताजींचे दणदणीत भाषण झाले होते. टाळ्यांनी सारा परिसर दणाणून गेला होता. दुर्दैवाने एक वर्षांने अगदी त्याच दिवशी त्याच वेळी अंबाझरी घाटावर त्यांची चिता जळत होती.
कार्यकर्त्याची छोट्यात छोटी गोष्ट लक्षात ठेवणारे दत्ताजी अशाच अनेक कार्यकर्त्यांच्या ह्रदयात अजूनही स्थानापन्न आहेत. आपल्या गडगडाटी हास्याला वैदर्भीय शिवराळ शब्दांची फोडणी देवून देशकार्य हे गंभीर चेहऱ्याने नव्हे तर हसतमुखाने करायचे असते असे सांगत अनेकांच्या चेहऱ्यावरील इस्त्री विस्कटवून त्याला लोकाभिमुखता शिकवणाऱ्या या महान संघटकाला पितृपक्षानिमित्त भावपूर्ण श्रद्धासुमन अर्पण करतो.

किशोर पौनीकर.

Leave a Reply