ईडी माझ्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो – उदयनराजे भोसले

सातारा : १४ ऑक्टोबर – सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आता यावर भाष्य केलं असून ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावं असं म्हटलं आहे.
उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले.
“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.

Leave a Reply