पैशाच्या वादातून महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले

नागपूर : १३ ऑक्टोबर – शहरातील जरीपटका पोलिस ठाणे हद्दीत पैशाच्या वादातून एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून आगपेटी लावून जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेवर रुग्णालयात उपचार होत असताना त्या बयाण देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दरम्यान, त्यांनी दिलेल्या बयाणानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजताच्या सुमारास फिर्यादी उषा प्रकाश तायडे (वय ५४), रा. भीमसेनानगर झोपडपट्टी, नागपूर या त्यांच्या ओळखीचे असलेले शेराबाबू मेश्राम यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी शेरा बाबूची आई माया, पत्नी रश्मी व शेराबाबू हे जोरजोराने ओरडून गाडीची किस्त भरायची असल्याने फिर्यादी उषा तायडे यांना पैसे मागा असे म्हणत होते. तेव्हा शेराबाबू यांनी उषा तायडे यांना तीस हजार रुपये मागितले. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी दिले नाही. यानंतर फिर्यादी या बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून आल्या. यावेळी घराच्या तेव्हा किचनमध्ये हे तिन्ही लोक हजर होते. यावेळी शेराबाबू यांची पत्नी आरोपी रश्मी मेश्राम हिने फिर्यादी उषा तायडे यांच्या अंगावर रॉकेल टाकले व आगपेटीची काडी लावून जाळून त्यांना जीवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेराबाबू यांनी उषा तायडे यांच्या अंगावर पाणी टाकून आग विझविली. जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारामुळे फिर्यादी या घटनेचे बयाण देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. दरम्यान, प्रकृती बरी झाल्यानंर त्यांनी घटनेचे बयाण नोंद केले. त्यांच्या बयाणावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३0७ भादंवि अन्वये गुन्हा नोदंविला आहे.

Leave a Reply