अमरावतीत अडीच लाखांचा संत्रा केला बागेतून लंपास

अमरावती : १३ ऑक्टोबर – मेघनाथपूर थांब्याजवळ रस्त्यालगत असलेल्या हर्षल प्र. पराते यांच्या शेतातील आठ एकरावरील संत्र्याच्या बागेतील तोडणीस आलेला संत्रा अज्ञातांनी रात्रीच्या वेळी लंपास केल्याची घटना घडली. तब्बल अडीच लाखांचा संत्रा तोडून नेण्यात आल्यामुळे हे मोठ्या टोळीचे काम असण्याची दाट शक्यता आहे.
स्थानिक विदर्भ मिल कॉलनीतील रहिवासी हर्षल पराते हे आपल्या मेघनाथपूर येथील शेतात संत्रा पिकाची पाहणी करायला गेले असता त्यांना सदर बगीचातील झाडांवर संत्री दिसली नाही. हा प्रकार काय म्हणून संपूर्ण बागेत फिरले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अन्य झाडांचीही संत्री चोरीला गेली.
आठ एकर जागेवर एक हजार दोनशे संत्रा झाडे असून गेल्या पाच-सहा दिवसापासून ते शेतात गेले नव्हते. मंगळवारी सकाळी शेतात गेले असता सदर प्रकार दिसला. या घटने संदर्भात सरमसपुरा पोलिस ठाण्यात त्यांनी तक‘ार नोंदवली. ठाणेदार शेख यांनी त्वरित दखल घेत शेतात जाऊन पंचनामा केला व अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply