अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी केला बहिणींच्या नावाचा वापर – किरीट सोमय्या

पुणे : १३ ऑक्टोबर – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली आहेत. इतकंच नाही तर अजित पवार यांनी बेनामी मालमत्ता गोळा करण्यासाठी आपल्या बहिणींच्या नावाचा वापर केल्याचंही सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी सांगितल्याप्रमाणे आज पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत
मुंबई उच्च न्यायालयानं आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटलंय की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झालाय. त्याची चौकशी झाली पाहिजे असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलीस आणि ईडीला दिले. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. यात राज्य सरकारचे पैसे आहेत. अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला पैसा जातो. अजित पवारांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला आणि स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं. स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यांनी सगळ्या बाबींचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांनी पदावर राहता येणार नाही, अशा शब्दात सोमय्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीय.
गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. त्यावेळी पहिल्या दिवशी अजित पवार यांनी खूप मोठं भावूक वक्तव्य केलं की फक्त रक्ताचं नातं म्हणून बहिणींच्या घरावर धाडी टाकल्या. मला पुण्यातील माहिती असते पण परिवाराबाबत माहिती नसते. म्हणून माझा प्रश्न शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंना आहे की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा जो मालक आहे, मुख्य भागधारक त्यात एक नाव आहे मोहन पाटील ते विजया पाटील यांचे पती आहेत. दुसरे आहेत निता पाटील. मला अजित पवारांना प्रश्न विचारायचा आहे की हे लोक कोण आहेत? आता खरं खोटं काय आहे ते पवारांनी स्पष्ट करावं.
अजित पवार विचारतात की आयकर विभाग माझ्या बहिणीच्या घरी का गेले? मग अजित पवारांना हे म्हणायचं आहे की बहिणींच्या नावाने बेनामी मालमत्ता अजित पवारांनीच उभी केली? मग त्या बहिणींना न सांगता अजित पवारांनी हे केलं का? हे फक्त जरंडेश्वर पुरतं मर्यादित नाही. विजय पाटील, मोहन पाटील, निता पाटील यांच्या अनेक कंपन्या आहे. त्यांनी प्रमुख कंपनी आहे कल्पवृक्ष प्रमोटर्स प्रायव्हेट लिमिटेड ती अजित पवारांच्या अनेक नामी-बेनामी कंपन्यामध्ये पार्टनर आहे. आता बेनामी कंपन्यांसाठी अजित पवार बहिणींच्या नावाचा उपयोग करत असतील तर दुर्दैवी गोष्ट आहे.
मला माहिती आहे की उपमुख्यमंत्री हे करु शकतात. कारण स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पत्नीच्या नावाने 19 बंगलोची बेनामी संपत्ती अलिबाग, कोरलेला उभी केली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना त्या कंपनीचे 95 टक्के शेअर्स 27 लेअर्स उभी केले अजित पवार यांनी. जरंडेश्वर साखर कारखानाच्या मूळ मालकापर्यंत पोहोचण्यासाठी मध्ये २७ नावं येतात. शेवटी ९५ टक्के शेअर्स हे स्पार्कलिंग सॉईल प्रा. लि. या कंपनीचे आहे आणि या कंपनीचे मालक, संस्थापक सुनेत्रा अजित पवार आणि अजित अनंतराव पवार आहेत. याला म्हणतात पवार परिवार… या कंपन्यांचा गुंतवणूक नामी, बेनामी 27 कंपन्यांपर्यंत आमची टीम पोहोचू शकली. पुढे मला माहिती नाही.

Leave a Reply