नादुरुस्त कारला धक्का मारत असताना ट्रक ने दिली धडक, एका युवकाचा जागीच मृत्यू तीन जखमी

नागपूर : १२ ऑक्टोबर – अमरावतीवरून नागपूरला येत असलेली कार सातनवरी शिवारात खराब झाल्याने धक्का मारत असलेल्या युवकांना मार्गावरून भरधाव जात असलेल्या ट्रकचालकाच्या दुर्लक्षितपणामुळे ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यात चार युवकांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री २.४0 दरम्यान घडली. आकाश मुरलीधर अडसुले (वय ३१, खरबी रोड, वाठोडा) असे मृतकाचे नाव आहे.
अमरावतीवरून नागपूर येत असलेली कार क्र. एम. एच. ३१ / एफ. ई. ५0८८ मध्ये आकाश मुरलीधर अडसुले, सुमित रमेश नागदेवे (वय ३१, दिघोरी), अश्विन जगन्नाथ वाकोडीकर (वय ३२), आकाश जगन्नाथ वाकोडीकर (वय ३0, तांडापेठ, पाचपावली) हे युवक होते.
नागपूरच्या दिशेने निघाले असता कारचे टायर पंक्चर झाल्याने टायर बदली केला. यानंतर कार सुरू होत नसल्याने कारचालक आकाशने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार सुरू झाली नाही. यावेळी त्यांच्याजवळ दोन कार थांबल्या. त्यामधील एका कारचालकांनी युवकांची कार सुरू करण्याचा प्रयत्न करीत असताना चारही युवक कारला धक्का मारत होते. नेमके याचवेळी मागून भरधाव ट्रकने नादुरुस्त कारला मागून जोरदार धडक दिली. घटनेची माहिती समजताच कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित कदम, एएसआई दिलीप इंगोले, पोलिस नायक प्रशांत कुंभारे घटनास्थळावर पोहोचले.

Leave a Reply