ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण दिले – पंकजा मुंडे

औरंगाबाद : १२ ऑक्टोबर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवला आहे. हा हल्लाबोल चढवतानाच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकही केलं आहे. ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही रोज उठताबसता जात काढत होता. त्याच मुख्यमंत्र्यांने मराठा समाजाला आरक्षण दिलं, असं जाहीर विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा यांच्या या विधानामुळे पंकजा आणि फडणवीस यांच्यात दिलजमाई झाल्याचं बोललं जात आहे.
औरंगाबाद येथे ओबीसी मेळाव्याला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आता एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. इकडे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न कुणी तरी उचलला की तिकडे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसणाचं काम तुम्हीचं केलं. ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही काढत होतात त्यांनीच मराठा समाजला आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने ते आरक्षणही संपुष्टात आणलं, असा घणाघाती हल्ला पंकजा यांनी चढवला.
या आरक्षणाचं भवितव्य काय आहे? या निवडणुकीत ओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवण्याचं काम सुरू केलं आहे. एखादा व्यक्ती ओपनच्या जागेवर निवडून येईल. पण त्याला मोक्याच्या ठिकाणी संधी मिळणार आहे का? आमची राजकीय आरक्षणाची मागणी नाही. तर शिक्षण आणि नोकऱ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे. पण आता आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांतील आरक्षणासह राजकीय आरक्षणही मागणारच आहोत, असं त्यांनी सांगितलं.
मोदींनी दहा टक्के आरक्षण दिलं आहे. ज्यांची आर्थिक ताकद नाही त्या सवर्णांनाही आरक्षण दिलं. देशातील 22 राज्यात आपली सत्ता आहे. या राज्यांनी निर्णय घेऊन बहुजनांना न्याय दिला. मी मंत्री असताना माझ्याकडे या गोष्टी येत होत्या. त्यावेळी ओबीसींचं 50 टक्क्यांवरचं आरक्षण धोक्यात आलं होतं. हे सरकार आल्यानंतर 50 टक्क्यांच्या खालचंही आरक्षण संपुष्टात आलं. ही लाजीरवाणी गोष्ट आहे. लोकांमध्ये संताप आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. भाजपच नाही तर ओबीसीही रस्त्यावर उतरला आहे. निवडणुका आहेत म्हणून अध्यादेश काढला. तोच आधी काढला असता तर. ज्या निवडणुका झाल्या त्यातही ओबीसींना फायदा झाला असताना, असं त्या म्हणाल्या.
वंचित आणि पीडीतांना लाभ मिळावा म्हणून बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. त्यामुळे अनेक मंत्री झाले. सरकार आलं आणि गेलं पण समाजाला न्याय मिळत नाही. माझं वय 42 वर्ष आहे. 42 वर्ष झालं तरी माझा संघर्ष सुरू आहे, असं सांगतानाच ओबीसींना आरक्षण द्या. त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू नका, नाहीतर तुम्हाला बाहेर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं. तुम्ही जो ओबीसींसाठीचा अध्यादेश काढला आहे. तो टिकवून दाखवा. तुम्ही हा अध्यादेश टिकवून दाखवला तर आम्ही तुमचं कौतुकच करू, असंही त्या म्हणाल्या. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही अन्याय खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Reply