वाघाच्या अवयवांसह ७ आरोपी गजाआड

नागपूर : ११ ऑक्टोबर – नागूपर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर-वर्धा महामार्गावरील हळदगांव टोल नाका येथे सापळा रचून वाघाच्या अवयवांसह ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, आरोपी नामे प्रकाश महादेव कोळी, रा.कामतदेव, ता.नेर, जि.यवतमाळ, प्रकाश रामदास राउत, रा.वरुड, ता.बाभुळगांव, जि.यवतमाळ, संदिप महादेव रंगारी, रा.वर्धा, अंकुश बाबाराव नाईकवाडे, रा.ईचोली, ता.जि.यवतमाळ, विनोद शामराव मुन, रा.सावळा, ता.धामणगांव, जि.अमरावती, विवेक सुरेशराव मिसाळ, रा.अंजनगांव, ता.जि.अमरावती व योगेश मानिक मिलमिले, रा.वरुड, जि.अमरावती यांनी मार्च,२०१८ च्या सुमारास मौजा उमरडा येथील वनक्षेत्रात वाघाची शिकार करुन वाघाचे अवयव आपसांत वाटप केले.
त्यानंतर पैशाच्या लोभापोटि वाघाच्या अवयवांची विक्री करण्याच्या दृष्टिने संपर्क केला. सदर माहिती वनविभागाला गुप्तहेराकडून कळताच नागपूर वनविभागाने सापळा रचला. सदर अवयवांची विक्री व्यवहार नागपूर येथे होणार असल्याची माहिती प्राप्त होताच वनविभागाची चमु नागपूर-वर्धा महामार्गावरील हळदगांव टोल नाका याठिकाणी दबा धरुन बसले असता, वाहन क्र.एमएच -४४-बी -५१५२ (तवेरा) वाहन टोल नाक्यावर पोहोचतांच वाघाच्या अवयवांसह ७ आरोपींना ताब्यात घेण्यात यश प्राप्त झाला. तसेच वाहन जप्त करण्यात आले. सदर आरोपींची कसुन चौकशी केली असता, त्यात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच उक्त प्रकरणी मागील वाघाचे अवयव तस्करी प्रकरणात आरोपींचा हस्तक्षेप आहे किंवा नाही ? याबाबतची तपासणी सुरु आहे. या सातही आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 चे कलम 2(16), 2(36), 9, 39, 44, 48, 49(B), 50 व 51 अन्वये वनगुन्हा क्र.04919/122953 दिनांक 10.10.2021 नोंदविण्यात आलेला आहे.

Leave a Reply