मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवणाऱ्या त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा – आशिष शेलार

मुंबई : ११ ऑक्टोबर – राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, सत्ताधारी पक्षांनी बंदचं आवाहन केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपाने सरकारवर टीका सुरू केली आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारच्या या बंदचा निषेध करत ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित “बंदसम्राटांचा” पुन्हा आज इतिहास आठवा, असं म्हटलंय.
राज्य सरकारवर निशाणा साधत शेलार म्हणाले, की “यांनीच मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले. युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी, श्रमिकांना देशोधडीला लावले,” असा आरोप त्यांनी केला.
एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरले आहे. आधी कोस्टल रोडला विरोध, नंतर नवी मुंबई आणि चिपी विमानतळाला विरोध त्यानंतर समृद्धी महामार्गला यांनी विरोध केलाय. हे सरकार मेट्रोचेही विरोधकच आहेत,” असं त्यांनी म्हटलंय.
हे सरकार मेट्रोचेही विरोधक असून ते राज्याच्या विकासाचे गतीरोधक आहेत, बंद आणि विरोध हाच यांचा धंदा असून त्यावरच त्यांचा चंदा गोळा होतो. या सरकारने आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद केलाय, ही या तिघाडीतील तीन पक्षांची “महिषासुरी” चाल आहे. आई दुर्गामाते तू राज्यातील जनतेला या महिषासुरांचा खेळ उधळून टाकण्याचं बळ दे, असं म्हणत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र युनिटमधील ७०० जवानांसह स्ट्राइकिंग साठा देखील मोक्याच्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे.

Leave a Reply