संपादकीय संवाद – मग गोवारी हत्याकांडाला शरद पवार काय म्हणणार?

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे जे काही घडले त्या मुद्द्यावरून संपूर्ण देशभरात विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरु केला आहे. देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग या घटनेशी केली आहे. त्यावरून काही पवार विरोधकांनी पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.
लखीमपूर घटनेत जे काही घडले ते दुर्दैवीच होते, त्याचे समर्थन आम्हाला करायचेही नाही. मात्र या घटनेची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना करणे फारसे उचित वाटत नाही, लखीमपूर घटनेत झालेले मृत्यू हे एक अंकी आकड्यात होते, तर जालियनवाला बाग घटनेत शेकडो निरपराधांचा बळी घेतला गेला होता. या घटनेची तुलना शरदराव पवार जर जालियनवाला बाग घटनेशी करणार असतील, तर १९९४ साली नागपुरात झालेल्या गोवारी आंदोलनातील मृत्यूंना काय म्हणायचे? याचे उत्तरही शरदरावांनी द्यायला हवे.
नोव्हेंबर १९९४ मध्ये नागपुरात गोवारी आंदोलनात घडलेली दुर्घटना ही गोवारी हत्याकांड म्हणूनच ओळखली जाते, माध्यमांनीच हे नाव प्रचलित केले आहे. या हत्याकांडात ११४ निरपराधांचा बळी गेला होता. हे आंदोलक मोर्चा घेऊन विधानभवनावर आले होते, त्यांना आरक्षणाची सवलत हवी होती, त्यासाठी मंत्र्यांनी येऊन आश्वासन द्यावे ही मोर्चेकऱ्यांनी मागणी होती. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री असलेले शरद पवार रास्ता चुकवून विमानतळावर रवाना झाले. कोणत्याही मंत्र्याला मोर्चेकऱ्यांना भेटायला पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या नव्हत्या, मोर्चेकरी वाट बघत रस्त्यावर निवांत बसले होते, अचानक कसलातरी आवाज झाला आणि गोळीबार होत असल्याची अफवा पसरली(किंवा पसरवली गेली) मोर्चेकरी सैरावैरा धावत सुटले त्यात खाली निवांत बसलेल्या अनेक वयोवृद्ध गोवारी बांधवांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. त्यातच ११४ जणांचा बळी गेला. मात्र बेशरम पवार सरकारने आंदोलकांना दिलासा न देता मोर्चेकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. या घटनेला आज २७ वर्ष होत आहेत. अजूनही गोवारी बांधव हे हत्याकांड विसरलेले नाहीत.
ज्या पवारांनी बेफिकिरी दाखवल्यामुळे हे हत्याकांड घडले, त्या पवारांना जिथे ७-८ मृत्यू होतात त्या घटनेला जालियनवाला बाग दुर्घटना म्हणण्याचा कितपत नैतिक अधिकार पोहोचतो याचा विचार पवारांनी करायला हवा. मात्र राजकारणात आपल्या चुकांकडे डोळेझाक करायची असते, आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, मात्र समोरच्याच्या डोळ्यातले कुसळ पटकन दिसते असा हा प्रकार आहे.
असे असले तरी जनता शहाणी झाली आहे, याचे भान पवारांनी ठेवायला हवे. पवारांनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केल्यानंतर लगेचच समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटल्या आहेत, त्यात मग गोवारी हत्याकांडाला काय म्हणणार? असा प्रश्न पवारांना विचारायला सुरुवात झाली आहे. आज ही ठिणगी आहे मात्र उद्या त्याचा मोहोळ उठल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव पवारांनी ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply