शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मदतीचे आकडे संतापजनक – देवेंद्र फडणवीस

मुंबई : ८ ऑक्टोबर – राज्यात अतिवृष्टीमुळे व पुराने नुकसान झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शासकीय मदत पोहचलेली नाही. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासाघाडी सरकारवर टीका केली आहे. “या सरकारमध्ये चाललेय तरी काय विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकर्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. वसुली आली की या सरकारचा ‘ससा’ होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, ‘कासव’.” असं फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “ मार्च, एप्रिल, मे २०२१ मध्ये अतिवृष्टी झाली तर मदतीचा जीआर ६ ऑक्टोबर २०२१ रोजी, जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. तर मदतीची प्रेसनोट ७ ऑक्टोबर २०२१ रोजी. सहा-आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार? ‘वसुली’साठी धावणारे सरकार, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का असे धडपडतेय्? विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकर्यांना तातडीने आणि भरीव मदत जाहीर झालीच पाहिजे. एकरी ५० हजारांची मागणी करणारे आता हात का आखडता घेताहेत? ”
तसेच, मदतीचे आकडे तर त्याहून संतापजनक असं सांगत, “ मार्च ते मे २०२१ : संपूर्ण रत्नागिरी जिल्हा ५.१० लाख, सिंधुदुर्ग जिल्हा २४ लाख, परभणी जिल्हा २५ लाख, हिंगोली १४ लाख, नांदेड २० लाख, उस्मानाबाद १.७४ लाख, यवतमाळ १० लाख, नागपूर २३ लाख, वर्धा ३९ लाख, गोंदिया २६ लाख, चंद्रपूर ३५ लाख रुपये फक्त ” ही आकडेवारी फडणवीसांनी दिली.
याचबरोबर, जुलै २०२१ च्या मदतीची भरघोस घोषणा, अशी खोचक टिप्पण करत, “ नागपूर विभागातील ६ जिल्हे मिळून फक्त १० कोटी रूपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील सर्व ५ जिल्हे मिळून फक्त १ लाख रूपये! म्हणजे एक जिल्हा फक्त २० हजार रुपये! शेतकऱ्यांप्रती ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?” अशा प्रकारे फडणवीसांनी याबाबतची माहिती देखील दर्शवली आहे.

Leave a Reply