माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा – संजय राऊत यांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

मुंबई : ८ ऑक्टोबर – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. हा वाद आता आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. एका प्रकरणात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी वकिलांमार्फत नोटिस पाठवली आहे. माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र संजय राऊत यांना पाठवलं होतं. त्यात त्यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. त्यावरुन संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिपण्णा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे, असं संजय राऊत म्हणाले होते.

Leave a Reply