श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा शाळेत घुसून गोळीबार, 2 शिक्षकांचा मृत्यू

श्रीनगर : ७ ऑक्टोबर – श्रीनगरच्या ईदगाह भागात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. दहशतवाद्यांकडून श्रीनगरच्या एका शाळेत घुसून शिक्षकांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन शिक्षक ठार झाल्याचं समजतंय. यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाचाही समावेश आहे. ईदगाह भागातील संगम शाळेत हा गोळीबार करण्यात आला. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चांद यांची हत्या करण्यात आलीय.
हे दोन्ही शिक्षक संगम शाळेत तैनात होते. ही उच्च माध्यमिक वर्गाची शाळा आहे. दोघेही शिक्षक अल्लोचोईबाग परिसरात राहत होते. शाळेत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी थेट शिक्षकांवर बंदूक रोखून गोळीबार केल्याचं सांगितलं जातंय.
या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. जम्मू काश्मीर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांतून दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतल्याचं समोर येतंय. गेल्या पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर गोळीबार करण्याची ही पाचवी घटना आहे. यामध्ये एकून सात नागरिक ठार झाले आहेत.

Leave a Reply