यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात ६०-७० जनावरे गेली वाहून, व्हिडीओ व्हायरल

यवतमाळ : ५ ऑक्टोबर – यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात बेलदारी येथील ६० ते ७० जनावरे वाहून गेली. या घटनेने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. जनावरे वाहून जात असतानाची ही घटना एका गावकऱ्याने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर काल यवतमाळ जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढले. बेलदारी येथील गाव तलाव ओव्हर फ्लो झाल्याने या तलावातून वेगाने पाणी वाहत होते. संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेलदारी येथील गुराखी आपल्या गाई-गुरे गावाकडे घेऊन जात असताना गावा शेजारच्या नाल्याला पूर आला. गाई, गुरे, वासरे हा नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात ते वाहून गेले.
पाण्याचा वेग एवढा होता की जनावर अक्षरशः एका मागोमाग वाहत गेली. ही घटना गावकऱ्यांना माहित होताच काही गायी, गुरांना वाचविण्यात आले. मात्र ६० ते ७० गायी, गुरे, वासरं नागरिकांच्या डोळ्या देखत वाहून गेले. या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Leave a Reply