नागपूरच्या शासकीय दांत महाविद्यालयात पहिली जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

नागपूर : ५ ऑक्टोबर – शासकीय रुग्णालयातील काम आणि दहा दिवस थांब असा अनुभव अनेकांना आहे. परंतु उपराजधानीतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने म्युकरमायकोसिसमुळे (काळी बुरशी) शस्त्रक्रियेतून जबडा काढावा लागलेल्या एका रुग्णावर नुकतीच यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ही मध्य भारतातील व शासकीय रुग्णालयातीलही पहिली जबडा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. यामुळे इतरही रुग्णांमध्ये चांगल्या उपचाराबाबत आशा जागृत झाल्या आहेत.
सूरज जयस्वाल (४५) रा. पांढरकवडा असे शस्त्रक्रिया झालेल्याचे नाव आहे. सूरजला काही महिन्यांपूर्वी करोना झाला. त्याला रेमडेसिवीरसह इतरही स्टेरॉईड व हाय डोज असलेले औषध घ्यावे लागले. करोनातून बाहेर आल्यावर त्याला म्युकरमायकोसिस झाला. त्याला शासकीय दंत रुग्णालयात आणले. येथे मुख शल्यक्रिया विभागात चार महिन्यांपूर्वी दातांसहित जबडा काढण्यात आला. कृत्रिम दंतोपचार विभागात तात्पुरत्या स्वरूपात कृत्रिम प्लेट टाकण्यात आली.
वेळीच ही प्रक्रिया केल्याने चार महिने रुग्णांला जेवणाचा कोणताही त्रास झाला नाही. सूरज यांचा जबडा काढण्यात आल्यामुळे चेहऱ्याची ठेवण बिघडली. हा चेहरा पूर्ववत व्हावा, म्हणून डॉक्टरांनी संगणकावर जबडय़ाबाबतचे डिझाईन तयार केले. यानंतर पेशंट स्पेसिफिक इम्प्लाट तयार करून ते रुग्णाला लावले. सध्या रुग्ण ठणठणीत आहे. मुख शल्यचिकित्सक तसेच शासकीय दंत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया झाली. कृत्रिम विभागप्रमुख डॉ. अरुण खेळीकर यांच्या विभागातून तात्पुरती प्लेट टाकण्यात आली. यावेळी सहयोगी प्राध्यापक डॉ. वर्षां मानेकर, दंत रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. वैभव कारेमोरे उपस्थित होते.
सूरज जयस्वाल याचा चार महिन्यांपूर्वी जबडा काढण्यात आल्याने चेहरा विस्कळीत झाला होता. परंतु डॉ. अभय दातारकर यांनी परिश्रम घेत पुन्हा हा चेहरा बऱ्याच अंशी पूर्ववत केला. रुग्णालयातून सुट्टी घेताना हा रुग्ण व त्याचे कुटुंब गहिवरले.

Leave a Reply