अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद

गडचिरोली : ५ ऑक्टोबर – आलापल्ली वनविभागा अंतर्गत मार्कंडा (कं) परिक्षेत्रातील नियतक्षेत्र मार्कंडा मधील ईल्लुर तसेच पेपरमिल परिसरातील मानवी जीवीतास धोकादायक ठरलेल्या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यामुळे आष्टी परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
आष्टी परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालून महिनाभरात दोघांना ठार तर तिघांना जखमी केल्याच्या घटना घडलया होत्या. त्यामुळे आष्टी परिसरातील नागरिकांत बिबट्याप्रती दहशत निर्माण झाली होती. नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक, नागपुर यांचेकडुन प्राप्त झाले.
त्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार व वरीष्ठांच्या सुचनेनुसार पेपरमिल परिसरात बिबट्याचा जास्त वावर असलेल्या ठिकाणी ३ पिंजरे लावण्यात आले. १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता पेपरमिल कॉलनी लगत लावलेल्या पिंजर्यात बिबट अडकला. जेरबंद बिबट्याला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले व त्याच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पशुधन विकास अधिकारी, चामोर्शी यांनी बिबट्याची आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली आहे व तसा अहवाल दिला आहे.
मागील काही दिवसांपासून इल्लुर तसेच पेपरमिल परिसरात सदर बिबट्याने दहशत निर्माण केली होते. बिबट्याच्या हल्यात महिला व मुले जखमी झाले व एफडीसीएम जंगल क्षेत्रात एक मुलगा व वन्यजीव क्षेत्रात एका वृध्द इसमावर हल्ला करून ठार केले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी केली होती. सदर जेरबंद बिबट्या (नर) निसर्ग अधिवासात मुक्त करावे किंवा गोरेवाडा रेस्क्यु सेंटर नागपूर येथे हलविण्यात यावे या संदर्भात आज ४ ऑक्टोबर २0२१ रोजी एसओपी समितीची वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कडा (कं.) येथे सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत जेरबंद बिबट्यास निसर्ग अधिवासात मुक्त करणे धोकादायक असल्याने सदर बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त यांचेकडे जेरबंद बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी प्राप्त होताच जेरबंद केलेल्या बिबट्यास गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. सभेत एसओपी वनाधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार, रामचंद्र बामनकर, वनश्री चापले व स्थानिक लोकप्रतिनिधी उपलब्ध होते.
बिबट्याला जेरबंद केल्याने या क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षांची परिस्थिती कायमची कमी झाली आहे. सदर कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार वनपरिक्षेत्र अधिकारी माकंर्डा (क.) भारती राऊत यांनी पार पाडली.

Leave a Reply