हातात एक हजार काठ्या घ्या, शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा – मनोहरलाल खट्टर यांचे विवादास्पद विधान

चंदीगड : ४ ऑक्टोबर – तीन कृषी कायदे रद्द करावे म्हणून तब्बल वर्षभरापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी उग्र आंदोलनही केले होते. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरीही आंदोलन करत असून देशभरातील शेतकरीही आंदोलनात सहभागी झाले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप असतानाच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकऱ्यांना काठीचीच भाषा समजते. हातात एक हजार काठ्या घ्या. शेतकऱ्यांचा बंदोबस्त करा. त्यांना जशास तसे उत्तर द्या, असं विधानच मनोहरलाल खट्टर यांनी केलं आहे. त्यामुळे देशभरातील प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
सीएम मनोहर लाल खट्टर चंदीगड येथे शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमाला आलो होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. आपल्या परिसरातील एक हजार लोकांनी काठ्या हातात घेऊन शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी जावं आणि शेतकऱ्यांचा बंदोबस्त करावा, असं खट्टर म्हणाले. खट्टर एवढंच बोलून थांबले नाहीत तर शेतकऱ्यांना जशास तसे उत्तर द्या. फार काय दोन तीन महिने तुरुंगात राहाल तर मोठे नेते व्हाल. जामिनाची काही चिंता करू नका, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
आपल्या विभागातील 500, 700, 1000 शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करा. त्यांना स्वयंसेवक बनवा. आणि काठ्या हातात घेऊन जशास तसे उत्तर द्या. तुम्ही चिंता करू नका. फार काय तुम्ही एक महिना, तीन महिने किंवा सहा महिने तुरुंगात जाल. पण मोठे नेते व्हाल. तुमचं नाव इतिहासात नोंदवलं जाईल, असं खट्टर म्हणाले.
खट्टर यांच्या या विधानावर संयुक्त किसान मोर्चाने संताप व्यक्त केला आहे. तसेच खट्टर यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही किसान मोर्चाने केली आहे. तर, एखाद्या मुख्यमंत्र्यांनी असं चिथावणीखोर विधान करायला हवं का?; असा चिमटा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी काढला आहे.
काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही खट्टर यांच्यावर टीका केली आहे. खट्टरजी तुम्ही भाजप कार्यकर्त्यांना आंदोलक शेतकऱ्यांवर हल्ला करायला सांगत आहात. शेतकऱ्यांवर हल्ला करा, तुरुंगात जा आणि नेते बनूनच बाहेर या, हा तुमचा गुरुमंत्र कधीच यशस्वी होणार नाही. संविधानाची शपथ घेऊन उघडपणे अराजकता पसरवणं हा देशद्रोह आहे. कदाचित मोदी, नड्डा यांची तुमच्या विधानाशी सहमती असेल, असा खोचक टोला सुरजेवाला यांनी लगावला आहे.

Leave a Reply