शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपचं अधिकृत धोरण आहे का? – संजय राऊत

मुंबई : ४ ऑक्टोबर – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी घडलेल्या हिंसाचारानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केलीय. आज उत्तर प्रदेशमध्ये जे सुरु आहे त्याविरोधात कोणी काही बोलणार आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित करत सध्या शेतकऱ्यांविरोधात सुरु असणारी क्रूर वागणूक हे भाजपाचं अधिकृत धोरण आहे का?, असं राऊत य़ांनी सत्ताधाऱ्यांना विचारलं आहे. इतकच नाही तर राऊत यांनी मोदी सरकारची तुलना ब्रिटीश राजवटीशी करताना क्रांतीकारक बाबू गेनू यांचाही उल्लेख केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात तर शेतकऱ्यांबद्दल तर फार बोलत असतात असं सांगत उत्तर प्रदेशमध्ये जो प्रकार घडला तो बाबू गेनू यांच्यावर ब्रिटीशांनी ट्रक चालवल्याच्या घटनेची आठवण करुन देणारा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात ही क्रूर वागणूक का दिली जात आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकरी देशद्रोही वाटले म्हणून अशी क्रूर कारवाई केली का?, असा प्रश्नही राऊतांनी विचारलाय.
उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असल्याचंही राऊत म्हणाले आहेत. तसेच घटनस्थळी विरोधी पक्षातील नेत्यांना जाण्यास बंदी घालण्यात आल्यावरुनही राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. “विरोधी पक्षाला तिथे जायला बंदी घातली आहे, ही कोणती लोकशाही आहे?” असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केलाय.

Leave a Reply