वऱ्हाडी ठेचा — अनिल शेंडे

श्रीमान भोगी !

आता गुंडेश्वरे देवे। या खंडणीने तोषावे
तोषोनी मज द्यावे। अभयदान हे ।।

भाई ,दादा नेते होवो।त्यांना मंत्रीपदे लाभो
तुरुंगातुनी त्यांचा चालो। कारभार ।।

तुरुंगातल्या सुविधा वाढो।तुरुंग पंचतारांकित होवो
राजवाड्याहुनी लाभो। ऐश तेथे।।

रस्त्यांवरील खड्डे वाढो।स्पेअरपार्ट्सचा
खप वाढो।
ठेकेदारांना मिळो काम।पुन्हा तेच तेच।।

रोज व्हावे अपघात।लोकांचे मोडावे पाय हात
अस्थिरोगतज्ज्ञ होवोत। गब्रूशेठ ।।

गटारांच्या गंगा वाहो।मच्छरांची प्रजा वाढो
साथीच्या रोगांचे वाढो। थै थै थैमान।।

दवाखान्यांचे मॉल होवो।रोग्याचे फुटबॉल होवो
इस्पितळे सारीच होवो। मालामाल ।।

दूरदर्शनच्या पडद्यावर।तामसी मालिका भाराभर
त्यानेच व्हावी संस्कारित। पिढी नवी ही।।

प्रभाग आणि प्रांतप्रांत।धर्म आणि जातपात
यांना ठेवावे झुंजवत। कोंबड्यांपरी।।

साऱ्या प्रजाजना ऐसेच।गुंतवावे गुंताड्यात
आणि होवावे आपण। श्रीमान भोगी ।।

        कवी -- अनिल शेंडे.

Leave a Reply