एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारे तिघे जेरबंद

नागपूर : ४ ऑक्टोबर – घर बांधण्यासाठी बक्कळ पैसा हवा असतो. अनेक वर्षांपासून साठवलेल्या पैशातून घर उभं राहतं. परंतु नागपुरातील एका भामट्याने कोणतेही कष्ट न घेता पैसा मिळवायचे आणि त्यातून घर बांधण्याचं म्हणून चक्क एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. या कामात त्याने आणखी दोन मित्रांची मदत घेतली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा प्लॅन फसला आणि ते तीनही चोर थेट पोलिसांच्या कोठडीत जाऊन पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणात स्वप्नील जांभुलकर, आकाश नाईक आणि प्रवीण लव्हाळे यांना अटक केली आहे.
नागपूरच्या सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहन नगर भीमसेन चौक येथील ॲक्सिस बँकेच एटीएम फोडत असलेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी याची दखल घेतली. त्यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले. पेट्रोलिंगवर असलेले कर्मचारी देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा तीनही आरोपी एटीएम फोडण्याची तयारी करत होते. मात्र एटीएम मशीन फोडण्याच्या आधीच पोलीस समोर उभे असल्याचे बघून तीनही आरोपींची भांभेरीच उढाली. पोलिसांनी त्या तीनही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये स्वप्नील जांभुलकर, आकाश नाईक, प्रवीण लव्हाळे यांचा समावेश असून हे तिघेही मित्र आहेत.
एटीएम मशीन फोडण्याच्या प्लॅनचा मास्टरमाइंड हा प्रवीण लव्हाळे आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एक प्लॉट खरेदी केला होता. त्यावर बांधकाम करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. मात्र कुठूनही पैसे मिळत नसल्याने त्याने थेट एटीएम फोडण्याचा प्लॅन तयार केला. या कामात त्याने आणखी दोघांची मदत घेतली. त्यांना सुद्धा पैशांची गरज होती. प्रवीण लव्हळेने आपल्या इतर दोन मित्रांना एटीएम फोडण्याचा प्लॅन सांगितला. एका रात्रीत बक्कळ पैसे कमावता येईल, असे प्रमोशन दिल्याने ते तयार झाले. तिघांनी मिळून काही दिवस एटीएमची रेकी केली. त्यानंतर हत्यार, मशीन फोडण्यासाठी आवश्यक साहित्य आणि पैसे नेण्यासाठी बॅग घेऊन ते एका एटीएममध्ये शिरले. लाईट बंद करून एटीएम फोडायला सुरुवात केली, तेवढ्यात याची सूचना पोलिसांना समजली. पोलिसांनी देखील क्षणाचा विलंब न करता थेट एटीएम सेंटर गाठून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. सध्या ते आरोपी अटकेत आहेत.

Leave a Reply